मेघालय आणि जम्मू-कश्मीर यांच्यात सुरू झालेल्या सामन्यात पहिल्याच दिवशी उभय संघांनी 198 धावांत 16 फलंदाज गमावले. जम्मू-कश्मीरने मेघालयाचा अवघ्या 73 धावांत खुर्दा पाडला. बामनभा शांगप्लिआंग (21) आणि अर्पित भटेवरा (24) यांनी 53 धावांची सलामी दिल्यानंतर अबिद मुश्ताकने या दोन्ही सलामीवीरांना बाद करत ही जोडी फोडली आणि त्यानंतर मेघालयाच्या डावात भूकंप झाला. अबिद आणि आकिब नबीने प्रत्येकी पाच-पाच विकेट टिपत अवघ्या 20 धावांत दहाही फलंदाज गारद करत बिनबाद 53 वरून मेघालयचा पहिला डाव 73 धावांत संपवला. त्यानंतर जम्मू-कश्मीरची घसरगुंडी उडाली. तरीही त्यांनी 6 बाद 125 अशी मजल मारत 52 धावांची आघाडी घेत सामन्यावरही आपली पकड घट्ट केली.