जाहीरनाम्यात प्रिंटिंग मिस्टेक झाली, अजित पवार यांच्या जाहीरनाम्याची अमोल कोल्हेंनी उडवली खिल्ली

विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून जाहीरनामा जाहीर केला जात आहे. अजित पवार यांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी जहरी टीका केली आहे. महायुतीचे आश्वासन म्हणजे केवळ पोकळ दावे असल्याचा टोला कोल्हे यांनी लगावला आहे. अजित पवारांच्या जाहीरनाम्यात एक प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. एक ओळ छापायची राहून गेली. आम्ही तुम्हाला चंद्र आणून देऊ अशा शब्दांत कोल्हे यांनी जाहीरनाम्याची खिल्ली उडवली आहे.

महाराष्ट्रावर साडेआठ लाख कोटींचे कर्ज असताना अडीच वर्षांत असंविधानिक आणि पक्ष फोडून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. हे त्यांनी कशासाठी केले? असा प्रश्न निर्माण होतो. पक्ष फोडून, चिन्ह पळवून, पक्षाचे नाव घेऊन जे काही मिळाले, त्यांनी साध्य काय केले. लोकसभा निवडणुकीत मतदान कमी पडल्याने ‘लाडकी बहीण योजना’ आणावी लागली, असा टोलाही कोल्हे यांनी लगावला. गेल्या दोन वर्षांत दहा जीवनावश्यक वस्तूंचे भाव या सरकारला स्थिर ठेवता आले नाहीत आणि आता ते भाव स्थिर ठेवण्याचे आश्वासन देत आहेत.