राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. बुधवारी नागपूर दौऱयावर आलेल्या काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधान सन्मान संमेलनात भाजपवर जोरदार हल्ला चढवला. देशाचे संविधान हे केवळ पुस्तक नाही तर ते देशाचे व्हिजन आहे. त्यामुळे संविधानाचे संरक्षण करणे हे देशातील समस्त नागरिकांचे कर्तव्य आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
संविधान नसते तर देशात लोकशाही नसती, निवडणूक आयोग नसता. स्वातंत्रपूर्व काळात देशात अनेक राज्ये होती. त्यांच्या राज्यात लोकशाही नव्हती, तेथे निवडणुकाही घेतल्या जात नव्हत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना मतांचा अधिकार दिला. त्या माध्यमातून तो दिल्लीतील सत्ता बदलू शकतो. हे संविधानाचे महत्त्व आहे, असे राहुल गांधी म्हणाले. संविधान हे 21व्या शतकातील व्हर्जन आहे. पण यातील विचार हजारो वर्ष जुने आहेत. जे यात सांगितले तेच बुद्धाने, अशोकाने सांगितले. सर्वच महापुरुषांनी सांगितले. तेच डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधींनी सांगितले. हे केवळ पुस्तक नाही. त sहिंदुस्थानचे व्हिजन आहे. हे जगण्याची पद्धत आहे. हे पुस्तक म्हणजे मरण्याची पद्धत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी बुधवारी नागपुरातील दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळय़ाला अभिवादन केले. या वेळी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.