थोडक्यात बातम्या – दिव्यांग मतदारांचे 14 नोव्हेंबरपूर्वी मतदान

मोहन प्रकाश विदर्भात वरिष्ठ निरीक्षकपदी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मोहन प्रकाश यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. त्यांची विदर्भ विभागासाठी वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशाने ही नियुक्ती जाहीर केली आहे. मोहन प्रकाश यांनी याआधी काँग्रेसचे प्रभारी म्हणून काम पाहिलेले आहे.

दिव्यांग मतदारांचे 14 नोव्हेंबरपूर्वी मतदान

नांदेड जिह्यात दिव्यांग मतदार आणि 85 वयाच्या पुढील मतदारांना 14 नोव्हेंबरपूर्वीच मतदान करता येणार आहे. या मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेतले जाणार आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी निवडणूक प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. याआधी लोकसभा निवडणुकीतही हा प्रयोग यशस्वी झाला होता.

मतदार जनजागृतीसाठी शिक्क्यांचा वापर

विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शिक्क्यांचा वापर करण्यात आला आहे. विदर्भातील वर्धा या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे. मतदार जनजागृतीचे संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मतदारसंघातील विविध डॉक्टर, कापड दुकानदार, पेट्रोल पंप, हार्डवेअरची दुकाने, मेडिकल स्टोअर, मॉल, किराणा दुकाने आदींचा समावेश आहे. या ठिकाणी बिलांवर जनजागृतीचे शिक्के दिले जाणार आहेत. आतापर्यंत 300 शिक्के बनविण्यात आले.