>> कॅप्टन नीलेश गायकवाड
एकीकडे देशातील विमान प्रवाशांची संख्या वाढत असताना दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे. गेल्या काही दिवसांत बॉम्बच्या धमक्यांमुळे इमर्जन्सी लँडिंग करण्याचे प्रकार घडले. सोशल मीडिया किंवा ई-मेलच्या माध्यमातून फसव्या धमक्या दिल्या जात असताना त्यांना चाप कसा बसवावा, हा खरा प्रश्न आहे. बनावट संदेश पकडण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे तरीही सुरक्षा संस्था खोट्या धमक्या देणाऱ्यांचा शोध लावू शकत नाहीत.
हवाई प्रवास सुरू करण्यापूर्वी बॉम्बच्या धमकीचा मेल किंवा फोन येणे आणि कालांतराने त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आढळून येणे या गोष्टी सातत्याने घडत आहेत. काही दिवसांपूर्वी लखनऊहून पुण्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची ‘एक्स’वरील पोस्ट ही दिशाभूल करणारी असल्याचे निष्पन्न झालेले असताना रविवारी पुणे-जोधपूर इंडिगो विमानात बॉम्ब असल्याचा मेल धडकला. मात्र तपासांती तो मेल गोंधळ निर्माण करणारा असल्याचे स्पष्ट झाले. एकूणच अशा फसव्या आणि धास्ती निर्माण करणाऱ्या मेलमुळे हवाई प्रवाशांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
कोणत्याही विमानाला आपत्कालीन स्थितीत लँडिंग करावे लागत आहे, तर कधी कधी विमानाचा मार्ग बदलावा लागत आहे व काही वेळा वेगवेगळ्या विमानतळांवर उतरावे लागत आहे. त्यांचा तपास केला असता त्यात कोणतेही संशयास्पद असल्याचे निदर्शनास येत नाही, पण तोपर्यंत विमानतळावर पळापळ झालेली असते आणि प्रवाशांचा वेळही वाया गेलेला असतो. शिवाय एअरलाइन्सला इच्छितस्थळी पोहोचण्यासाठीदेखील विलंब होतो. रेल्वेलाही अशा प्रकारच्या धमक्यांनी ग्रासले आहे. रेल्वे मार्गावरही कधी कधी गॅस सिलिंडर, लोखंडी गर्डर यांसारखी सामग्री आढळून येते आणि यामुळे अपघात हाऊ शकतो. सणासुदीच्या काळात तर प्रत्येक जण घरी सुरक्षित जाऊ इच्छित असतो, परंतु अशा प्रकारच्या घटनांनी आणि वातावरणामुळे असुरक्षितता निर्माण झाली आहे. विमान प्रवास तर सर्वात सुरक्षित अणि सुलभ प्रवास मानला जातो, परंतु फसव्या संदेशामुळे आणि धमक्यांमुळे हवेतदेखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या धमक्या सोशल मीडियावरून व्हायरल केल्या जात आहेत. अशा प्रकारच्या धमक्यांबद्दल थोडाही हलगर्जीपणा दाखविणे चुकीचे राहू शकते. म्हणून विमान कंपन्या कोणत्याच धमक्यांकडे कानाडोळा न करता तपासणीबाबत आग्रही असतात.
सोशल मीडिया किंवा ई-मेलच्या माध्यमातून फसव्या धमक्या दिल्या जात असताना त्यांना चाप कसा बसवावा, हा खरा प्रश्न आहे. बनावट संदेश पकडण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे तरीही सुरक्षा संस्था खोटय़ा धमक्या देणाऱयांचा शोध लावू शकत नाहीत. यामागचे कारण पाहिले तर असा खोडसाळपणा जगाच्या कानाकोपऱयात बसून कोठूनही करता येऊ शकतो. समाजपंटक हँडलर हे सोशल मीडियावर अकाऊंट तयार करण्यासाठी व्हर्च्युअली प्रायव्हेट नेटवर्क किंवा डार्क वेब ब्राऊजरचा वापर करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. म्हणून त्यांचा आयपी अॅड्रेसचा शोध लावतानादेखील पोलिसांना बराच वेळ लागतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोटय़ा प्रोफाईलचा मारा केला जातो. या प्रकारच्या धमक्यांबाबत आता सरकारने कडक धोरण अंगीकारले आहे. गृह मंत्रालयाने विमान कंपन्यांकडून संपूर्ण अहवाल मागितला आहे.
समाजपंटकांकडून प्रवाशांना हानी न पोहोचविणारे, परंतु गंमत वाटणारे कृत्य केले जात असले तरी त्यामुळे विमान कंपन्यांवर आर्थिक बोजा वाढत आहे. विमा कंपन्या अगोदरच अडचणीत सापडलेल्या आहेत. तेलाच्या किमती वाढत असताना त्याचा ताण प्रवाशांवर येऊ नये आणि कर्मचाऱयांनाही वेतन देताना अडथळा येऊ नये यासाठी कसरत करावी लागत असताना सुविधांवरही बराच खर्च उचलावा लागत आहे. अशा धमक्यांमुळे कंपन्यांना उड्डाणे वळविणे, सुरक्षेची तपासणी, घिरटय़ा घालण्यासाठी अतिरिक्त इंधन आणि अडकलेल्या प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये मुक्कामाची सोय करणे यांसारख्या आकस्मिक खर्चांना सामोरे जावे लागत आहे. या बनावट धमक्यांच्या तपासात प्रथमदृष्टय़ा कोणतेही कारस्थान असल्याचे दिसून येत नाही. त्यापैकी बहुतांश कॉल लहान मुले आणि समाजपंटकांनी केल्याचे आढळून आले आहे.
अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाने कडक नियमांची योजना आखली आहे. मंत्रालयाच्या सूत्रानुसार, विमानाच्या सुरक्षेसंदर्भात सुरक्षा यंत्रणांसह विविध भागीदारांच्या बैठकांच्या अनेक चर्चेच्या फेऱया झाल्या. मंत्रालयाकडून बॉम्बच्या खोटय़ा धमक्यांना रोखण्यासाठी कडक नियमावली तयार केली जात आहे. त्यात आरोपींना ‘नो फ्लाय’ यादीत टाकणे याचा समावेश आहे. यानुसार कोणत्याही दोषी व्यक्तीला विमानातून प्रवास करण्याची मुभा दिली जाणार नाही. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीशी (बीसीएएस) संबंधित नियमांसह सध्याच्या नियमांत दुरुस्ती करण्याचादेखील विचार केला जात आहे. या आधारावर दोषींना कडक शिक्षा देता येणे शक्य आहे. विमान प्रवासावरचा लोकांचा विश्वास ढळणार नाही यासाठी आवश्यक पावले टाकण्याची गरज आहे. दहशत संपविण्यासाठी परिणामकारक तंत्र विकसित करणेदेखील महत्त्वाचे आहे. शाळेतदेखील यासंदर्भात जनजागृती अभियान राबवायला हवे. जेणेकरून मुले अशा प्रकारचे कृत्य करणार नाहीत. काही मुले आपल्या मित्रांना अडकविण्यासाठी त्यांच्या नावावर हँडल तयार करून विमान कंपन्यांना धमकी देत असल्याचे आढळून आले आहे. अशा गैरकृत्यांना पायबंद घालण्याची आवश्यकता आहे. सरकारने विमानांत एअर मार्शलची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक संशयितांची ओळख पटविली असून त्यांना वेळीच वेसण घालणे आवश्यक आहे.