वांद्र्यातील वांद्रे-कुर्ला संकुलातील ग्राऊंडवर बुधवारी महाविकास आघाडीची महाराष्ट्र स्वाभिमान सभा पार पडली. या सभेत महाविकास आघाडीचा पंचसूत्री वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी भाषण करता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार फटकारले आहे. फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधण्याचे आव्हान दिले. त्या आव्हानाचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला.
”मागच्या एका सभेत मी म्हणालो होतो की आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातच काय आम्ही सुरतेला देखील मंदिर बांधू. पण देवाभाऊ यांना छत्रपती शिवाजी महाराज सहनच होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज बोलल्यानंतर यांच्या अंगाची लाहीलाही होते. त्यानंतर फडणवीसांनी मला आव्हान दिलं की मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवा. देवा भाऊ जाऊ तिथे खाऊ. मुंब्र्याच्या प्रवेशद्वारावर जे शिल्प आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, जिजाऊ आहेत, तुकाराम महाराज आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा येऊन तिथे बघा. तुम्ही ज्या मुंब्र्याबद्दल बोलताय ते मुंब्रा हे ठाणे जिल्ह्यात येतं. ज्या जिल्ह्यातून तुम्ही आमच्यातला गद्दार फोडला व मुख्यमंत्री म्हणून त्याला डोक्यावर बसवला. त्या गद्दाराच्या जिल्ह्यात छत्रपतींचं मंदिर बांधणं अवघड वाटत असेल तर त्याला डोक्यावर घेतलंच कशाला? त्याला डोक्यावर घेऊन नाचलात कशाला? म्हणून वेडिवाकडी आवाहन आम्हाला देऊ नका, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
‘महागाईमुळे फराळातले पदार्थ गायब झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या योजनांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ दिसायला लागला आहे. शिवसेनेचे मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आपण पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. महागाई वाढतेय त्यावर हे मोदी मिंधे आवर घालू शकत नाहीत. यांनी वाटलेल्या आनंदाच्या शिध्यातही उंदराच्या लेंड्या मिळतायत. गरिबांना उंदराच्या लेंड्या देता हा तुमचा आनंद. असे बकवास लोकं आपल्यावर राज्य करत आहेत. आपलं सरकार आल्यानंतर तेल साखर तांदूळ गहू ज्या काही पाच जीवनावश्यक वस्तू असतील त्यांचे भाव शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता स्थिर राखून दाखवल्याशिवाय राहणार नाही”, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
”आज चांगली सभा आयोजित झाली कारण आपण जे काही करतो ते खुलेआम करतो काळोखात काही करत नाही. वचननामा देखील खुलेआम जाहीर केला. महिलांसाठी जी योजना आहे ती नुसती चालू ठेवणार नाही तर त्यात भर टाकणार आहोत. शेतकऱ्यांचं कर्ज तीन लाखांपर्यंतचं माफ करणार आहोत. आम्ही जे बोलतो तेच करतो, आणि जे करतो तेच बोलतो. पंचसूत्रीचा कार्यक्रम पाच सूत्रांपर्यंत मर्यादित नाही. इतरही बऱ्याच योजना आहेत. आपल्या राज्यात मुलगे अनेक आहेत. काही शिकत आहेत. काहींना इच्छा असते पण शिकू शकत नाही. त्यामुळे आपण महाराष्ट्रातील मुलांना देखील मुलींप्रमाणे शिक्षण मोफत देणार आहोत. त्यानंतर त्यांना रोजगार मिळेपर्यंत काय करायचं ते देखील या पंचसूत्रीत आहे. प्रत्येक बेरोजगार तरुणांना दर महिन्याला चार हजार रुपयांची मदत करणार आहोत. तरुण हे आपलं भविष्य असेल तर त्याला पाठिंबा द्यावा लागेल. या सरकारच्या कपाळकरंट्या कारभारामुळे तरुण जर नासला जात असेल तर त्याला महाविकास आघाडीचं सरकार उभारी देण्याचं काम करेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.