विश्वास उडाला…! नेतन्याहू यांनी इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यांची केली हकालपट्टी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी अचानक देशाचे लोकप्रिय संरक्षण मंत्री योव गॅलांट यांना बडतर्फ करण्याची घोषणा केली. सध्याचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅट्झ यांची नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली जाईल आणि गिडॉन सार हे परराष्ट्र मंत्री म्हणून कॅट्झच्या जागी नियुक्त होतील. गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान नेतन्याहू आणि गॅलांट यांच्यात अनेक वेळा मतभेद निर्माण झाले आहेत. मात्र, नेतान्याहू यांनी त्यांना हटवण्याचे टाळले होते.

नेतन्याहू यांनी मागच्या वर्षी मार्चमध्ये जेव्हा गॅलांट यांना बर्खास्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाविरोधात देशात आंदोलन झाले होते. पंतप्रधान नेतन्याहू यांनी आपल्या या निर्णयाची घोषणा मंगळवारी उशीरा केली. या घोषणेमध्ये नेतन्याहू म्हणाले की, गाझा आणि लेबनॉनमध्ये इस्त्रायलचे सुरू असलेल्या युद्धांच्या व्यवस्थापनाबद्दल गॅलांट यांच्यावरील विश्वास उडालेला आहे.

बेंजामिन यांनी आपल्या कार्यालयातून जारी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मागच्या काही महिन्यांमध्ये हा विश्वास उडालेला आहे. हे लक्षात घेता, मी आज संरक्षण मंत्री यांचा कार्यकाळ सपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर गॅलांट यांनी तत्काळ एक्सवर एक पोस्ट शेअर केली. त्यात ते म्हणाले की, इस्त्रायलची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काम करणे हे कायम माझ्या जीवनाचे ध्येय असेल.

नेतन्याहू म्हणाले की, “इस्रायलचे पंतप्रधान म्हणून माझे सर्वोच्च कर्तव्य आहे की, इस्रायलच्या सुरक्षेचे रक्षण करणे आणि आम्हाला निर्णायक विजयाकडे नेणे. युद्धादरम्यान, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्यात पूर्ण समन्वय असतो. सुरुवातीला हा विश्वास होता आणि आम्ही मोहिमेच्या सुरुवातीच्या महिन्यांत बरेच काही साध्य केले. मात्र, माझ्या आणि संरक्षणमंत्र्यांमधील हा विश्वास अलीकडच्या काही महिन्यांत कमी झाला आहे.”

नेतन्याहू म्हणाले की, “मोहिमेच्या व्यवस्थापनावरून गॅलांट आणि माझ्यामध्ये गंभीर मतभेद निर्माण झाले. मी हे मतभेद दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु ते अधिकाधिक व्यापक होत गेले. हे मुद्दे सार्वजनिकरित्या अस्वीकार्य पद्धतीने प्रसिद्ध झाले आणि आमच्या शत्रूंनी त्या परिस्थितीचा फायदा घेतला.”