पर्यटकांसह हजारो प्रवाशांना मनस्ताप कायम, कोट्यवधींचा चुराडा तरी मोरा बंदर गाळातच

उरण मोरा बंदरातील गाळ काढण्यासाठी गेल्या चार वर्षांत तब्बल सवा सहा कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. एवढा खर्च करूनदेखील परिस्थिती जैसे थे आहे. बंदरातील गाळ काढूनही ओहोटीच्या वेळी अनेकदा उरण-मोरा बंदरातील प्रवासी लाँच सेवा गाळात रुतते. त्यामुळे तासन्तास असंख्य प्रवाशांना भरसमुद्रात लटकावे लागते. कामानिमित्त दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसत आहे. दरम्यान गाळ काढण्यासाठी आतापर्यंत केलेला सर्व खर्च पाण्यात गेला आहे.

उरण-मोरा बंदरातून दक्षिण मुंबईत पोहोचण्यासाठी अवघा एक तास लागतो. बायरोड एसटी आणि नवी मुंबईतून ट्रेनने प्रवास केला तरीही प्रवास खर्चासाठी प्रवाशांना 80 ते 100 रुपये मोजावेच लागतात. त्याचप्रमाणे वाढत्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण, वाहतूककोंडी आदींचाही त्रास सहन करावा लागतो. दुसरीकडे मात्र उरण ते मुंबई लाँचमार्गे प्रवास करीत असताना 80 रुपये मोजावे लागत असून रस्त्याच्या प्रवासापेक्षा

निम्म्या वेळेत मुंबईत पोहोचता येते. मात्र या मार्गाने प्रवास करत असताना येथील प्रवाशांना अनेक असुविधांना सामोरे जावे लागते. यात सर्वात मोठी समस्या म्हणजे मोरा बंदरात सातत्याने गाळ साठत असल्याने विशेषतः ओहोटीमुळे प्रवासी लाँचेस जेटीला लागत नाहीत. कधी कधी नवख्या सारंग- ड्रायव्हरमुळे लाँचेस गाळात रुतून बसत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

अभ्यास गट स्थापन होणार

मोरा बंदरातून गाळ काढण्यासाठी मागील चार वर्षांत सवा सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मोरा बंदराच्या सभोवार मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या माती, दगडाच्या प्रचंड भरावामुळे बंदरात गाळाची समस्या निर्माण होत आहे. गाळाची समस्या कायमची दूर करण्यासाठी लवकरच अभ्यास गट स्थापन केला जाणार असल्याची माहिती मुंबई मेरिटाईम बोर्डच्या मरिन विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांनी दिली.