आपल्या इंडियन प्रीमियर लीगच्या खेळाडूंच्या लिलावाचा मेगा खेळ सौदी अरबच्या जेद्दाह शहरात येत्या 24 आणि 25 नोव्हेंबरला घेणार असल्याचे आज जाहीर केले. सलग दुसऱयांदा आयपीएलचा लिलाव परदेशात केला जाणार आहे. 2024 च्या आयपीएलपूर्वी झालेल्या लिलावाचे दुबईत आयोजन करण्यात आले होते.
गेले काही दिवस आयपीएलच्या लिलावाच्या ठिकाणाबाबत वेगवेगळय़ा ठिकाणांची नावे घेतली जात होती, मात्र आज बीसीसीआयने त्यावरचा पडदा उघडताना येत्या 24 आणि 25 नोव्हेंबरला जेद्दाहमध्ये लिलाव होणार असल्याचे निश्चित केले. आयपीएल लिलावासाठी झालेल्या नोंदणीत एकूण 1574 खेळाडूंनी आपली नोंद केली. यात 1165 हिंदुस्थानी तर 409 परदेशी खेळाडूंनी नोंद केली. हा लिलाव सोहळा हिंदुस्थानी संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱया आणि चौथ्या दिवशी रंगेल.
204 खेळाडूंचा लिलाव रंगणार
आयपीएलच्या मेगा लिलावासाठी 1574 खेळाडूंनी नोंदणी केली असली तरी त्यापैकी 204 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. या लिलावात 320 खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले आहेत तर 1224 खेळाडू हे एकही आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत. या लिलावात तब्बल 965 खेळाडू हिंदुस्थानी आहेत, जे एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाहीत. 320 आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी 48 खेळाडू हे हिंदुस्थानी आहेत आणि उर्वरित खेळाडू अन्य देशांचे असल्याचे समोर आले आहे. या लिलावातून प्रत्येक संघासाठी 25 खेळाडूंचीच निवड करणे बंधनकारक आहे.
हिंदुस्थान आणि 16 देश
आयपीएलमध्ये 60 ते 65 टक्के खेळाडू हे हिंदुस्थानीच असतील. पण जे 70 खेळाडू परदेशातून घेतले जाणार आहेत त्यासाठी सुमारे 16 देशांतील 409 खेळाडूंची नावे लिलावासाठी निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी 70 खेळाडूंनाच आयपीएलमध्ये खेळता येणार आहे. लिलावासाठी हिंदुस्थानानंतर दक्षिण आफ्रिकेचे 91 तर ऑस्ट्रेलियाचे 76 खेळाडू लिलावासाठी सज्ज झाले आहेत. कसोटी दर्जा असलेल्या संघासह कॅनडा, अमेरिका, इटली, नेदरलॅण्ड्स, स्कॉटलंड, अमेरिका, यूएई, झिम्बाब्वेच्या खेळाडूंना लिलावात स्थान देण्यात आले आहे.
641 कोटींमध्ये 204 खेळाडूंच्या लिलावाचे लक्ष्य
आयपीएलच्या दहा संघांसाठी 204 खेळाडूंसाठी बोली लावली जाणार आहे. यासाठी सुमारे 641.5 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. 204 पैकी 70 खेळाडू हे विदेशी असतील, हे आधीच निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत दहा संघांनी 558.5 कोटी रुपयांत 46 खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. प्रत्येक फ्रेंचायझीला संघनिर्माणासाठी 120 कोटी रुपये देण्यात आले आहे.
पंत, राहुलवर विक्रमी बोलीची शक्यता
हिंदुस्थानी संघात तुफानी फलंदाजी करत असलेल्या ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सने मुक्त केले आहे. तसेच श्रेयस अय्यर, के. एल. राहुल यांनाही मुक्त करण्याचा निर्णय फ्रेंचायझीजनी घेतला आहे. श्रेयसच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने जेतेपद पटकावण्याचाही पराक्रम केला. तरीही त्याला कायम न ठेवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या लिलावात पंत आणि राहुलला मोठी बोली लावून खरेदी केले जाईल, असा अंदाज आयपीएल तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.