राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी – रासपच्या उमेदवाराचा आत्महत्येचा प्रयत्न; उपचारासाठी आदिलाबादला हलवले

Nanded News
Nanded News

किनवट विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवित असलेले गोविंद जेठेवार यांनी आज सकाळी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. किनवट विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाकडून गोविंद सांबन्ना जेठेवार यांनी देखील अर्ज दाखल केला होता. काही दिवसापासून ते तणावात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आज सकाळी गोविंद सांबन्ना जेठेवार यांनी विषारी औषध प्राशन केले आणि त्यात ते बेशुद्ध झाले.

संभाजीनगरात उमेदवारांची भाऊगर्दी; 8 मतदारसंघांत दोन-दोन ईव्हीएम लागणार
छत्रपती संभाजीनगरात उमेदवारांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. जिह्यात एकूण 8 मतदारसंघ असून या ठिकाणी उमेदवारांनी मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल केल्याने मतदानासाठी दोन-दोन ईव्हीएम उपलब्ध करावे लागणार आहेत. तर कन्नड मतदारसंघात केवळ नोटा या पर्यायासाठी वेगळ्या ईव्हीएमचा वापर करण्याची वेळ निवडणूक प्रशासनावर आली आहे. 20 नोव्हेंबरला होणाऱया मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्मचाऱयाला एक पंट्रोल युनिट, दोन बॅलेट युनिट आणि एक व्हीव्हीपॅट मशीन आणावी लागणार आहे. एका ईव्हीएमवर 16 उमेदवारांची नावे बसू शकतात. कन्नडमध्ये एकूण 16 उमेदवार रिंगणात आहेत.

क्रेटातून एक कोटींची रोख रक्कम जप्त
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर साताऱयाजवळील शेंद्रे येथे वाहन तपासणीत सुमारे एक कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. क्रेटा कारमध्ये सापडलेली ही रक्कम महामार्ग पोलिसांनी जप्त केली आहे.

हसन मुश्रीफ यांचा माज जनता उतरविणार
निवडणुका आल्या की, हसन मुश्रीफ यांना मतदारांना पैसे देऊन विकत घेण्याची सवय लागली आहे. त्यांना पराकोटीचा सत्तेचा माज आलेला आहे. हा माज विधानसभेच्या निवडणुकीत जनता नक्की उतरवेल, असे गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी म्हटले.