बिट हे चवीला जरी तुरट असले तरी शरीराला मात्र ते अत्यत फायदेशीर आहे. बिटामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीर निरोगी राखण्यासाठी बिट अत्यंत फायदेशीर आहे. तसेच बिटामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर राहते. असे हे बिट चवीला तुरट असल्याने आपल्या आहारात फार खाल्ले जात नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला बिटाचा पराठा कसा बनवायचा ते सांगणार आहोत.
साहित्य – बिट, किसलेलं पनीर, किसलेलं चीज, चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो, पुदिना, गाजर, आलं, लिंबू, गव्हाचं पीठ, कोथिंबीर, आलं लसून पेस्ट
कृती – सर्वप्रथम बिट व गाजराचे छोटे तुकडे करून घ्या. हे तुकडे व अर्धा टोमॅटो, आल्याचा छोटा तुकडा , दोन ते तीन पाकळ्या लसून पाणी टाकून मिक्सरमद्ये त्याचा ज्यूस तयार करून घ्या. तो ज्यूस गाळणीने गाळून घ्या. उरलेला चोथा परातीत काढा, त्यात ओवा, गव्हाचं पीठ, मीठ, टाकून बिटाचा ज्यूस वापरून पीठ मळून घ्या. त्यानंतर किसलेलं पनीर, किसलेल चीज, चिरलेली कोथिंबीर, आलं लसून पेस्ट, मीठ एकत्र करून त्याचं सारण बनवून घ्या. मळलेल्या पिठाचा गोळा तयार करून त्यात हे सारण भरा व हलक्या हाताने लाटा. लाटलेला पराठा तव्यावर तूप घालून खरपूस भाजून घ्या. लोण्यासोबत सर्व्ह करा