विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या दिवशी रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार उदय बने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात आता 8 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांना आज निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले की, रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून 9 उमेदवारांनी अर्ज भरले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अपक्ष उमेदवार उदय बने यांनी अर्ज मागे घेतला. आता निवडणूक रिंगणात 8 उमेदवार आहेत. एकूण 5 अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांना चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून बाळ माने – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), उदय सामंत – शिंदे गट, भारत सिताराम पवार – बहुजन समाज पक्ष, कैस नूरमहंमद फणसोपकर- अपक्ष, कोमल किशोर तोडणकर – अपक्ष, ज्योतिप्रभा प्रभाकर पाटील – अपक्ष, दिलीप काशीनाथ यादव – अपक्ष आणि पंकज प्रताप तोडणकर – अपक्ष हे उमेदवार रिंगणात आहेत.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 2 लाख 11 हजार 221 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 42 हजार 048 पुरुष मतदार आणि 1 लाख 49 हजार 162 महिला मतदार आहेत. 11 तृतीयपंथी मतदार आहेत. 85 वयोगटावरील मतदारांची संख्या 3 हजार 661 आहे. त्यामध्ये 1 हजार 479 पुरुष आणि 2 हजार 182 महिला मतदार आहेत. 1 हजार 213 दिव्यांग मतदार आहेत. त्यामध्ये 764 पुरुष आणि 449 महिला मतदार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली.