नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीसाठी आणि नऊ विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर आता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 19 उमेदवार तर जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघासाठी आता 185 उमेदवार रिंगणात आहेत.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 39 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 20 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने 19 उमेदवार रिंगणात आहेत. तर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात 72 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 39 उमेदवारांनी आज माघार घेतली आहे. आता तेथे 33 उमेदवार रिंगणात आहेत. किनवट विधानसभा मतदारसंघात 29 जणांनी अर्ज भरले होते. आज 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तेथे 17 उमेदवार रिंगणात आहेत.
हदगाव विधानसभा मतदारसंघात 63 उमेदवार रिंगणात होते. तेथे 39 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून 24 उमेदवार रिंगणात आहेत. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 51 उमेदवार रिंगणात होते. तेथे 31 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून 20 उमेदवार रिंगणात आहेत. लोहा विधानसभा मतदारसंघात 33 उमेदवार रिंगणात होते. तेथे 19 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज अर्ज मागे घेतले असून 14 उमेदवार रिंगणात आहेत.
नायगाव विधानसभा मतदारसंघात 26 उमेदवार रिंगणात होते. तेथे 16 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून 10 उमेदवार रिंगणात आहेत. देगलूर विधानसभा मतदारसंघात 27 उमेदवार होते. तेथे 16 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आता 11 उमेदवार रिंगणात आहेत. मुखेड विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 6 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने तेथे 11 उमेदवार रिंगणात आहेत.
भोकर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 115 उमेदवारांनी माघार घेतली असून, 25 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. भोकर विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातुन सर्वाधिक 140 इच्छुक उमेदवारांपैकी 115 उमेदवारांनी माघार घेतली असून 25 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. यात 14 उमेदवार विविध पक्षातर्फे तर 11 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. लढत मुख्यतः महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे तिरुपती कोंढेकर, महायुतीतर्फे भाजपच्या श्रीजया चव्हाण, वंचित बहुजन आघाडी तर्फे सुरेश राठोड तर अपक्ष उमेदवार नागनाथ घिसेवाड यांच्यात प्रामुख्याने होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात 458 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 293 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, आता 185 उमेदवार रिंगणात आहेत.