सोयाबीनचे भाव कोसळले आहेत. त्याचा जबरदस्त फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अशाच एका हतबल शेतकऱ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. शेतकऱ्यांनी मायबाप सरकारची वाट पाहिली तरी सरकारला दया आली नाही. आता शेतकरी सरकारची ‘वाट’ लावणार, असे रोहित पवार यांनी म्हटलेय.
कळंब तालुक्यातील शेतकऱ्याचा हा व्हिडीओ आहे. प्रतीक दुधाडे असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्याची 14 एकर जमीन आहे. त्यापैकी 6 एकर जमिनीवर त्याने सोयाबीनचे पीक घेतले. 29 ऑक्टोबर रोजीचा हा व्हिडीओ आहे. या दिवशी कळम तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला 2200 रुपये क्विंटल भाव लागला. सरकारचा अधिकृत भाव रुपये 4890 असताना प्रतीक दुधाडेला फक्त 2200 रुपये क्विंटल भाव मिळाला. शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचा हा प्रकार असल्याचे सांगत शेतकरी प्रतीक याने व्हिडीओत नाराजी व्यक्त केली.
सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभावापेक्षा खूप कमी दर मिळत आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने सातत्याने दुर्लक्ष केले. सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा नुसता पाऊस पाडलाय. मात्र शेतकऱ्यांचे शुक्लकाष्ठ संपलेले नाही. त्यांची दिवाळी निराशेत गेली. वाट पाहून शेतकऱ्यांना नाइलाजाने हमीभावापेक्षा कमी दरात बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.