पंढरपुरात परिचारकांचे बंड झाले थंड; समर्थक मात्र करेक्ट कार्यक्रम करण्यावर ठाम

गेल्या निवडणुकीत मी मदत केली, या निवडणुकीत समाधान आवताडे यांनी मला मदत करावी, असा साधा प्रस्ताव प्रशांत परिचारक यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे ठेवला होता. मात्र या प्रस्तावाकडे फारसे गांभीर्याने न पाहता भाजपने आमदार समाधान आवताडे यांची उमेदवारी जाहीर केली. आपल्या नेत्याला विश्वासात न घेता पक्षाने उमेदवार लादल्याने परिचारक यांच्या पांडुरंग परिवारात अन्यायाची अन् अवमानाची भावना पसरली आहे. दरम्यान, प्रशांत परिचारक यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली. पक्ष नेतृत्वाच्या दबावापोटी परिचारक यांनी दोन पावले मागे जाण्याचा निर्णय घेतला असला, तरी पांडुरंग परिवाराचे कार्यकर्ते मात्र करेक्ट कार्यक्रम करण्यावर ठाम आहेत.

सन 2009मधील विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तत्कालीन विद्यमान आमदार सुधाकर परिचारक यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार, हे गृहीत धरून प्रचाराचा नारळ फोडला. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी परिचारक यांच्यावर कुरघोडी करीत उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेतली होती. मोहिते-पाटील यांच्या या राजकीय कुरघोडीने नाराज झालेल्या परिचारक समर्थकांनी मतदानातून आपला वचपा काढून मोहितेपाटील यांना पराभूत केले. त्या वेळीही परिचारक आणि मोहिते-पाटील यांचे मनोमिलन करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी शिष्टाई केली. नेत्यांचे मनोमिलन झाले; पण कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यावर झालेला अवमानाचा बदला मतपेटीतून घेतला होता.