वार्तापत्र अहिल्यानगर – अहिल्यानगर जिह्यात 7 रणरागिणी निवडणूक रिंगणात

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अहिल्यानगर जिह्यातून सात महिलांना संधी मिळाली आहे. आता 4 नोव्हेंबरनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडीने तीन, तर महायुतीने दोन महिलांना संधी दिली आहे. तर एक महिला अपक्ष म्हणून रिंगणात उभ्या ठाकल्या आहेत. त्यात एक महिला अशी आहे की तिने यापूर्वी कोणतीही निवडणूक लढविलेली नाही. या महिलांच्या मतदारसंघांकडे नगरवासीयांचे लक्ष लागले आहे.

पाच महिलांपैकी एक दहा वर्षांपासून आमदार आहेत. तर चारही महिला जिल्हा परिषद निवडणूक लढलेल्या आहेत. या सर्व महिलांना पक्षांनी अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या महिला निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्टच आहे.

या वेळी 2024मध्ये मात्र बदलत्या राजकीय समीकरणानुसार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांनी महिलांना संधी दिली आहे. त्यामुळे या पाचही महिला अधिकृत पक्षाच्या उमेदवार आहेत. एक अपक्ष महिला रिंगणात उतरणार आहे. भाजपने दोन महिलांना संधी दिली आहे. त्यात शेवगाव-पाथर्डीतून विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना हॅट्ट्रिक करण्याची, तर श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. आमदार राजळे या तर दहा वर्षे आमदार होत्या. तर प्रतिभा पाचपुते यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढली आहे. याच श्रीगोंदा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने अनुराधा नागवडे यांना उमेदवारी दिली आहे. नागवडे या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राहिल्या आहेत. तर पारनेरमधून राणी लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यादेखील जिल्हा परिषद सदस्य होत्या.

या निवडणुकीत श्रीगोंदा मतदारसंघात प्रतिभा पाचपुते व अनुराधा नागवडे यांच्यात सरळ लढत होणार आहे. त्याप्रमाणे शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात आमदार मोनिका राजळे व हर्षदा काकडे अशी लढत आहे. शिर्डीत प्रभावती घोगरे आणि विखे-पाटील यांच्यात लढत आहे. पारनेरमध्ये राणी लंके यांची काशीनाथ दाते यांच्याशी लढत होत आहे.

2014 मध्ये भाजपने शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून मोनिका राजळे व कोपरगावमधून स्नेहलता कोल्हे यांना संधी दिली होती. या निवडणुकीत राजळे व कोल्हे या दोघीही आमदार झाल्या होत्या. त्यानंतर 2019मध्ये केवळ शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात आमदार मोनिका राजळे या एकमेव महिला निवडणूक रिंगणात होत्या. त्याही भाजपच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढल्या आणि विजयी झाल्या होत्या.

शिर्डी मतदारसंघात काँग्रेसने प्रभावती घोगरे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. घोगरे या यापूर्वी कोणतीही निवडणूक लढल्या नाहीत. त्या विधानसभा निवडणुकीत जिह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमोर लढत आहेत. या लढतीकडे संपूर्ण जिह्याचे लक्ष लागणार आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून अपक्ष म्हणून हर्षदा काकडे या रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी यापूर्वी चार जिल्हा परिषद निवडणूक लढल्या असून त्या जिल्हा परिषद सदस्य राहिल्या आहेत.

नगर शहर मतदार संघातून काँग्रेसने बंडखोरी केली असून मंगला भुजबळ या निवडणुकीसाठी उभ्या आहेत, तर दुसरीकडे माजी महापौर संदीप कोतकर यांच्या पत्नी सुवर्णा कोतकर याही निवडणुकीमध्ये उभ्या आहेत.