हिंदुस्थान–चीन सीमेवर पेट्रोलिंग सुरू, पूर्व लडाखमधील लष्करी संघर्ष संपुष्टात

करारानुसार पूर्व लडाखमधील तणावाचे ठिकाण असलेल्या डेपसांग मैदान आणि डेमचोकमधून हिंदुस्थान आणि चीनने आपल्या चौक्या हटवल्या असून सैन्यमाघारीची प्रक्रियाही पूर्ण झाली. त्यानंतर आजपासून हिंदुस्थानच्या लष्कराने पूर्व लडाखच्या डेमचोक परिसरात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जून 2020 पासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. विशेषतः गलवान खोऱयातील संघर्षानंतर हा तणाव आणखी वाढला होता. दरम्यान, डेपसांग येथेही लवकरच गस्त घालण्यास सुरुवात होणार आहे.

दिवाळीनिमित्त गुरुवारी दोन्ही देशांच्या अधिकाऱयांनी पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग्स, काराकोरम पास, दौलत बेग ओल्डी, केंगकला आणि चुशुल-मोल्डो येथे एकमेकांना मिठाई भरवली आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आज संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशातील बुमला खिंडीत चिनी सैनिकांशी संवाद साधला. याबाबतचा व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.  दोन्ही देशांतील तणाव संपुष्टात आला असून आता या भागात निर्धास्त होऊन गस्त घालता येईल, असे जवानांनी रिजिजू यांच्याशी संवाद साधताना सांगितले. दोन्ही देशांमध्ये करार झाल्यामुळे आता सीमेवरील अनेक भागात पायाभूत सुविधा देता येतील तसेच विकासकामे करता येतील, असेही रिजिजू म्हणाले.

एलएसी कराराचे अमेरिकेकडून स्वागत

हिंदुस्थान चीनमध्ये झालेल्या एलएसी कराराचे अमेरिकेने स्वागत केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मॅथ्यू मिलर यांनी याबाबत निवेदन जारी केले आहे. हिंदुस्थान-चीनमधील करार तसेच सीमेवरील घडामोडींवर अमेरिका बारीक नजर ठेवून असल्याचे मिलर यांनी स्पष्ट केले आहे. सीमेवरील सकारात्मक घडामोडींचे स्वागत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

चार मुद्दय़ांवर करार

हिंदुस्थान आणि चीनमध्ये लडाखमधील डेपसांग अंतर्गत 4 मुद्दय़ांवर करार झाला. परंतु, गलवान व्हॅली आणि डेमचोकमधील गोगरा हॉट स्प्रिंग्समध्ये गस्त घालण्याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. हिंदुस्थानी सैनिक आता गस्त घालण्यासाठी डेपसांगमधील गस्त बिंदू 10,11,11-ए, 12 आणि 13 वर जाऊ शकतील. पेट्रोलिंग पॉइंट-14 म्हणजेच गलवान व्हॅली, गोगरा हॉट स्प्रिंग्स म्हणजे पीपी-15 आणि पीपी-17 हे बफर झोन आहेत. येथे गस्तीबाबत नंतर विचार केला जाईल.

गलवान खोऱयातील झटापटीनंतर तणाव

जून 2020 मध्ये गलवान खोऱयात झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यामध्ये 20 जवान शहीद झाले होते तर अनेक चिनी सैनिकही मारले गेले होते. मे 2020 पासूनच दोन्ही देशांमध्ये सीमेवर तणाव निर्माण झाला होता. जोपर्यंत चीनसोबतचे संबंध सामान्य होत नाहीत तोपर्यंत सीमेवर शांतता प्रस्थापित होणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत हिंदुस्थानने डेपसांग आणि डेमचोक भागातून चिनी सैन्याला हटविण्यासाठी दबाव वाढवला होता.