लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असणाऱ्या ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत येत्या 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी संप पुकारल्याबाबतचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे कुठल्याही विभागातील शाखा अधिकारी किंवा विभाग अधिकाऱयांनी कर्मचाऱयांनी घेतलेल्या रजांची खातरजमा करावी आणि सक्षम कारण असले तरच सुट्टी द्यावी, असे परिपत्रकच जारी केले आहे. दरम्यान, रविवारी भाऊबीज असल्याने कर्मचाऱयांनी संप पुकारल्यास ‘लाडक्या भावा’ची प्रचंड गैरसोय होणार आहे.
मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ‘बेस्ट’ने दररोज 35 लाखांवर मुंबईकर प्रवास करतात. सर्वसामान्यांना अगदी घराजवळ घेऊन जाणारी बेस्ट पहिल्या पसंतीची ठरते. मात्र ऐन सणासुदीच्या दिवसांत संपाची घोषणा होत असल्यामुळे मुंबईकरांना दरवेळी प्रचंड हाल सहन करावे लागतात. या वर्षीदेखील नेमक्या भाऊबीजच्या दिवसापासून संप करणार असल्याचे मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे प्रवाशांमध्येही संभ्रमावस्था पसरली असून प्रवाशांची चिंता वाढली आहे.
असा आहे व्हायरल मेसेज
दिवाळी बोनस, कोविड भत्ता, ऑग्रिमेंट आणि विलीनीकरण या मागण्यांसाठी 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी कामगारांनी संप पुकारला आहे. त्यामुळे वरळी, कुलाबा आणि इतर आगारात बंदची हाक देण्यात आली असा मेसेज व्हायरल झाला आहे.
प्रशासनाचे आदेश
सेवकवर्गाने 1 नोव्हेंबरपूर्वी घेतलेल्या किंवा त्यानंतर लागून घेतलेल्या रजेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही रजा मंजूर करू नयेत. शिवाय साप्ताहिक सुट्टय़ा किंवा कामाच्या वेळेतील बदल्याच्या विनंत्यांची पडताळणी करावी!
‘बेस्ट’ कामगार सेना सहभागी नाही
सोशल मीडियामध्ये ‘बेस्ट’ बंदबाबत कोणतेही मेसेज प्रसारित होत असले तरी ‘बेस्ट’ कामगार सेने’ने अशा प्रकारचा कुठलाही संप पुकारला नसल्याची माहिती बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिली. आर्थिक संकटातून जाणाऱया बेस्टला कामगारांसह सर्वांनीच सहकार्य करण्याची गरज असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली. आमचे लक्ष्य ‘बेस्ट’ वाचवण्याचे असल्याचे ते म्हणाले.