बोरिवली-विरार लोकल मार्गावरील पाचव्या व सहाव्या लेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात पुन्हा एकदा खोडा आला आहे. येथील मिठागर जमिनीच्या संपादनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने या संपादनाला अंतरिम स्थगिती दिली आहे.
न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठाने हे अंतरिम आदेश दिले आहेत. नियमानुसार हे संपादन न झाल्याने आम्ही त्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. तरीही अन्य मार्गाने प्रशासन मिठागर मालकाची संपादनासाठी मनधरणी करू शकते. नियमाअंतर्गत ही कार्यवाही प्रशासनाला करता येईल, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
ब्रिटिश काळापासून मिठागराची मालकी
कमलाबाई शांताराम भोईर व अन्य यांनी ही याचिका केली आहे. हे मिठागर ब्रिटिश काळापासून आमच्या मालकीचे आहे. तशी सरकारी दफ्तरी नोंद आहे. सॉल्ट डिपार्टमेंट आमच्या परवानगीशिवाय राज्य शासनाला मिठागराची जमीन देऊ शकत नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
प्रतिज्ञापत्र सादर करा
या याचिकेचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य शासनासह अन्य प्रतिवादींना दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी चार आठवडय़ांनी होणार आहे.