टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामधील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील पहिला दिवस आज संपला असून न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात सर्व विकेट गमावत 235 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 4 गड्यांच्या मोबदल्यात 86 धावा केल्या.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कर्णधाराचा निर्णय यशस्वी करण्यात न्यूझीलंडचे फलंदाज अपयशी ठरले. टीम इंडियाचे फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी आपल्या फिरकीच्या जाळ्यात एक एक करत 9 फलंदाजांना अडकवले. विशेष म्हणजे 6 फलंदाजांना दुहेरी आकडा सुद्धा घाटता आला नाही. कर्णधार टॉम लॅथम (28 धावा), व्हिल यंग (71 धावा), मिचेल (82 धावा) आणि फिलीप्स (17 धावा) यांच्यामुळे न्यूझीलंडला 235 धावांपर्यंत मजल मारता आली. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या तर, वॉशिंग्टन सुंदरने 4 आणि मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली.
प्रत्तुयत्तरात फलंदाजी साठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा (18 धावा) आणि यशस्वी जयस्वाल (30 धावा) संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले. मोहम्मद सिराज भोपळा न फोडताच माघारी परतला. विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठी अपेक्षा होती. परंतु चार या धावसंख्येवर त्याला हेन्रीने धावबाद केले आणि टीम इंडियाला मोठा धक्का बसला. मात्र, शुभमन गिलने संयमी खेळी करत नाबाद 31 धावांपर्यंत मजल मारली आहे. तसेच ऋषभ पंत 1 या धावसंख्येवर नाबाद आहे. दिवस अखेर टीम इंडियाने 4 विकेट गमावत 86 धावा केल्या आहेत. अजूनही टीम इंडिया 149 धावांनी पिछाडीवर आहे.