ठाणे, रायगड, पालघरमध्ये छाननीत 77 उमेदवार बाद; भिवंडी पूर्वमध्ये सर्वाधिक 30 तर सर्वात कमी महाडमध्ये आठ

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची काल बुधवारी छाननी झाल्यानंतर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील 77 उमेदवार बाद झाले आहेत. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील एकूण 31 मतदारसंघात आता 511 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 30 उमेदवार भिवंडी पूर्व मतदारसंघात तर सर्वात कमी आठ उमेदवार महाड मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २९ ऑक्टोबरपर्यंत होती. ही मुदत संपल्यानंतर काल दाखल झालेल्या अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघासाठी 381 उमेदवारांनी 495 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 47 उमेदवारांचे 78 अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता फक्त 344 उमेदवार उरले आहेत. शहापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक आठ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. पालघर मधील सहा विधानसभा मतदारसंघासाठी 90 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 13 उमेदवारांचे अर्ज बाद झाले असल्याने निवडणुकीच्या रिंगणात आता 77 उमेदवार उरले आहेत. रायगडात 7 मतदारसंघासाठी 111 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 17 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

सोमवारी चित्र स्पष्ट
उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीची प्रक्रिया पूर्ण करून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र अर्ज मागे घेण्यासाठी येत्या सोमवारपर्यंत मुदत आहे. तोपर्यंत अनेक अर्ज मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार उरणार आहेत, हे चित्र सोमवारीच स्पष्ट होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.