गेल्या वर्षभरापासून हिंदुस्थान आणि कॅनडामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. कॅनडाने हिंदुस्थानावर बिनबुडाचे आरोप केल्यानंतर आता तिथल्या गुप्तचर संघटनेने मोठा आरोप केला आहे. एजन्सीचा आरोप आहे की, सायबर तंत्रज्ञानाद्वारे हिंदुस्थान परदेशात फुटीरतावाद्यांवर लक्ष ठेवत असल्याचा आरोप केला आहे. तसेच हिंदुस्थान कॅनडावर सायबर हल्ला करत असल्य़ाचा आरोप केला आहे.
कॅनडाच्या कम्युनिकेशन्स सिक्युरिटी एस्टॅब्लिशमेण्टनुसार, हिंदुस्थान सायबर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फुटीरतावाद्यांवर लक्ष ठेवून आहे. एजन्सीचा आरोप आहे की, हिंदुस्थान कॅनडाच्या सरकारी नेटवर्कवर हल्ले करण्यासाठी सायबर तंत्रज्ञान वापरत आहे. याबाबत कॅनडाच्या कम्युनिकेशन्स सिक्युरिटी एस्टॅब्लिशमेंटच्या प्रमुख कॅरोलिन झेवियर म्हणाल्या, आम्ही हिंदुस्थानकडे एक उदयोन्मुख सायबर धोक्याचा देश म्हणून पाहतो हे स्पष्ट आहे. सायबर हल्ल्यांमुळे हिंदुस्थान आणि कॅनडाचे संबंध बिघडल्याचे एजन्सीचे म्हणणे आहे.
एजन्सीने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, कॅनडाच्या आरोपानंतर, हिंदुस्थान समर्थक हॅकटिव्हिस्ट गटाने लष्कराच्या साईटसह कॅनेडिएन संकेतस्थळावर DDoS हल्ले केले. संकेतस्थळाला ऑनलाइन ट्रॅफिकने भरले आहे. त्यामुळे लोकं वेबसाइटपर्यंत पोहोचू शकले नाही.
18 जून 2023 रोजी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडातील सरे शहरात असलेल्या गुरुद्वाराबाहेर काही अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सप्टेंबर 2023 मध्ये या हत्येमागे हिंदुस्थानी एजंट असल्याचे सांगितले होते. ट्रुडोच्या गंभीर आरोपांना उत्तर देताना हिंदुस्थानने आरोप फेटाळले होते. कॅनडाने या प्रकरणी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. या प्रकरणानंतर दोन्ही देशांमधील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. 14 ऑक्टोबर 2024 रोजी ट्रूडो सरकारने पुन्हा एकदा निज्जरच्या हत्येमध्ये हिंदुस्थानचा सहभाग असल्याचा पुनरुच्चार केला होता.