देशभरातील अनेक मोठमोठय़ा भूखंडांचे श्रीखंड मोदी सरकार अदानींच्या घशात घालून त्यांच्या तिजोऱया भरत असताना सरकार आता हिमालयही विकायला काढण्याची शक्यता आहे. कारण गौतम अदानींची नजर थेट हिमालयावर गेली आहे. अदानी समूह शेजारील देश भूतानमधील गेलेफू माइंडफुलनेस सिटीमध्ये गुंतवणुकीसाठी प्रयत्न करत आहे. भूतान आपल्या दक्षिण सीमेवर मेगा टाऊनशिप प्रकल्प सुरू करणार असून त्यावर अदानी समूह डोळा ठेवून असल्याचे चित्र आहे.
या प्रकल्पात अदानी समूहाने रस दाखवल्याच्या वृत्ताचा संदर्भ देताना गेलेफूचे गर्व्हनर लोटे शेरिंग म्हणाले की, भूतान हिंदुस्थानच्या सीमारेषेजवळ सुमारे एक हजार चौरस किलोमीटरच्या परिसरात टाऊनशिप उभारण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे. या प्रकल्पात सौर ऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी अदानी समूहाशी बोलणी सुरू असल्याचे शेरिंग यांनी म्हटले आहे. या भागात रिन्यूएबल एनर्जी प्रकल्पांसाठी अनेक ठिकाणी जागा शोधण्यात आल्या असून यात आशियातील मोठय़ा गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यात येऊ शकते.
– रस्ते, पूल आणि विविध पायाभूत प्रकल्पांच्या बांधकामासाठी नियोजित करारांचाही प्रकल्पात समावेश आहे. ऊर्जा प्रकल्प आणि जलविद्युत प्रकल्पांव्यतिरिक्त येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बंदर बांधण्याचाही विचार आहे.
– अदानी समूहाचा हा करार यशस्वी झाला तर शेजारील देशातही अदानी समूह हातपाय पसरू शकते. अदानी समूह सध्या इस्रायल, केनिया, श्रीलंका, बांगलादेश आणि व्हिएतनाममध्ये विद्यमान प्रकल्पांचा विस्तार करत आहे.