डोनाल्ड ट्रम्प यांचा सफाई कामगाराच्या गणवेशात प्रचार, कचऱ्याच्या ट्रकमध्ये बसून विरोधकांच्या टीकेला उत्तर

बायडेन यांनी ट्रम्प समर्थकांना कचरा म्हटल्यानंतर त्याचे अमेरिकेच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटले. बायडेन यांना उत्तर देण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सायंकाळी सफाई कामगारांचा गणवेश परिधान केला. डोक्यावर लाल टोपी आणि सफाई कामगाराचे जॅकेट घालून ते कचऱ्याच्या ट्रकमध्ये बसले आणि प्रचारासाठी ते  मैदानात उतरल्याचे चित्र होते. कचऱ्याच्या ट्रकमध्ये बसूनच त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. कमला हॅरिस आणि जो बायडेन यांच्या वक्तव्याचा हा विरोध आहे, असे ट्रम्प म्हणाले. कमला आमच्या समर्थकांबद्दल काय विचार करतात हे बायडेन यांनी तंतोतंत सांगितले आहे, परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की अमेरिकेतील 250 दशलक्ष लोक कचरापेटी नाहीत, अशा शब्दांत ट्रम्प यांनी उत्तर दिले.

नेमका वाद काय?

ट्रम्प यांनी 27 ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये सभेचे आयोजन केले होते. यावेळी कॉमेडियन टोनी हिंचक्लिफ यांनी पोर्टो रिकोचे वर्णन कचऱ्याचे बेट असे केले होते. यावर बायडेन म्हणाले होते. पोर्टो रिको समुदायाचे लोक प्रेमळ असून त्यांचे अमरिकेच्या विकासात मोठे योगदान आहे. उलट मला ट्रम्प यांचेच समर्थक कचरा पसरवताना दिसतात.  यावरून मग ट्रम्प यांनीही त्यांना उत्तर दिले.

हिस्पॅनिक वंशाचे लोक पोर्टो रिकोमध्ये राहतात. ते स्पॅनिश बोलतात. ‘प्यू रिसर्चसर्वेक्षणानुसार 2024 मध्ये 60 टक्के हिस्पॅनिक मतदार डेमोव्रॅटिक पक्षाचे समर्थक आहेत. त्याचवेळी रिपब्लिकन पक्षाला 34 टक्के हिस्पॅनिक मतदारांचा पाठिंबा मिळत आहे.