क्लिष्ट व गुंतागुंतीच्या गुह्याचा उत्कृष्ट तपास करणाऱया राज्यातील 11 पोलीस अधिकाऱयांना दिवाळी विशेष भेट मिळाली आहे. या अधिकाऱयांना ऐन दिवाळीत केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. मुंबई पोलीस दलातील एसीपी व गंभीर गुह्यांचा तपास करण्यात हातखंडा असलेल्या ज्योत्स्ना रासम यांनादेखील हे मानाचे पदक जाहीर झाले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने आज उत्कृष्ट गुन्हे तपास अधिकाऱयांना गृहमंत्री दक्षता पदकांची घोषणा केली. त्यात एसीपी ज्योत्स्ना रासम, निरीक्षक गिरीश सोनावणे, एसडीपीओ राहुल धस, अपर अधीक्षक अभिषेक शिवथरे, सहाय्यक निरीक्षक हेमंत बेंडाळे, उपअधीक्षक नितीन जाधव, एसडीपीओ संदीप मिटके, वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे, सहाय्यक निरीक्षक उत्कर्ष वझे, निरीक्षक अंशुमन चिंतामण, वरिष्ठ निरीक्षक विजय भोसले यांचा समावेश आहे. एसीपी ज्योत्स्ना रासम यांनी अनेक क्लिष्ट व संवेदनशील गुह्यांचा अचूक तपास करत ते उघडकीस आणले आहेत.
इतकेच नाही तर आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर करून त्यांना शिक्षा मिळविण्यातही यश प्राप्मत केले आहे. साकीनाका बलात्कार व हत्या, लैला खान प्रकरणात रासम यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. यासाठी त्यांना विविध पथकांनी सन्मानित करण्यात आले आहे.