जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत असलेल्या दिल्लीची हवा दिवाळीच्या फटाक्यांमुळे आणखी बिघडल्याचे चित्र दोन दिवसांपासून आहे. दिल्लीत जिकडे तिकडे धुरक्याची चादर असून श्वसनाचे आजार आणखी बळावण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री शहरात छोटी दिवाळी साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने मोठय़ा प्रमाणावर आतषबाजी झाली. त्या धुराचे लोट गुरुवारी सकाळपासूनच सर्वत्र दिसत होते.
दिल्लीत गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास एअर क्वालिटी इंडेक्स 328 इतके नोंदवले गेले. दिल्लीत प्रदूषण सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारवर अनेकदा ताशेरे ओढले आहेत. दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या याबद्दलही विचारणा केली आहे.
आपकडून फटाके नाही, दिवे पेटवा मोहीम
दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीकडून फटाके नाही, दिवे पेटवा मोहीम राबवण्यात आली. आपचे नेत्यांनी विविध ठिकाणी दिवे पेटवून दिवाळी साजरी केली. यावेळी फटाके नको, दिवे पेटवा असा संदेश देणारे फलक आपच्या कार्यकर्ते आणि नेत्यांकडून झळकावण्यात आले.