हिंदुस्थान-चीन सीमेवरही एकमेकांना मिठाई वाटून दिवाळी साजरी करण्यात आली. तर दुसरीकडे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तवांग येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सध्याची स्थिती पाहता सीमा सुरक्षेसाठी देशाला प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे. मात्र, शेजारील राष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे हेच हिंदुस्थानचे स्पष्ट धोरण आहे. एकमताने आम्ही चीन आणि हिंदुस्थानच्या सीमेवर शांतता प्रक्रिया पुढेही कायम ठेवू. याबाबत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आदर्श समोर ठेवू, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदुस्थान आणि चीनच्या सीमेवरून सैन्य माघारी घेण्यात आल्यानंतर भाष्य केले. त्यांनी आज अरुणाचल प्रदेशातील तेजपूर येथे हिंदुस्थानी लष्कराच्या गजराज कॉर्प्सला भेट दिली.
हिंदुस्थान-चीन सीमेवरील डेप्सांग आणि डेमचेक येथून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया बुधवारीच पूर्ण झाली. गस्तीबाबत लवकरच ग्राऊंच कमांडरच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. ग्राऊंड कमांडर्समध्ये ब्रिगेडियर आणि त्याहून कमी दर्जाचे अधिकारी असतात. दिवाळीनिमित्त एलएसीसह पाच सीमांवरील विविध ठिकाणी हिंदुस्थान आणि चीनच्या सैन्याने एकमेकांना मिठाई वाटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान,एलएसीवर गस्तीबाबत हिंदुस्थान आणि चीन यांच्यात झालेल्या करारावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सैन्य मागे घेणे ही पहिली पायरी असून पुढील पायरी म्हणजे तणाव कमी करणे ही असेल. हा तणाव तेव्हाच कमी होईल जेव्हा हिंदुस्थानला खात्री होईल की चीनलाही तेच हवे आहे. तणाव कमी झाल्यानंतर सीमेचे व्यवस्थापन कसे करायचे यावर चर्चा केली जाईल असे परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले होते.
सीमेवर शांततेसाठी सर्व प्रयत्न करणार
देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की आपण मित्र बदलू शकतो, परंतु शेजारी बदलू शकत नाही. त्यामुळे शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करणे हेच हिंदुस्थानचे स्पष्ट धोरण आहे. त्याच मार्गावर आपल्यालाही चालायचे आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. सध्याची जी स्थिती आहे त्या स्थितीत देशाला सीमा सुरक्षेसाठी प्रचंड संघर्ष करावा लागणार असून सीमेवर शांतता कायम राहावी यासाठी सरकार हरतऱहेचे प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. हिंदुस्थान आणि चीनमध्ये झालेला करार आणि परस्पर संवाद हे दोन्ही देशांसाठी सर्वात मोठे यश आहे, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानातही दिवाळी साजरी
इस्लामाबाद पाकिस्तानातही दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ या हिंदू आणि शीख धर्मियांसह उत्सवात सहभागी झाल्या. त्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. व्हर्च्युअल आतषबाजीही केली. तसेच हिंदू महिलांशी संवाद साधून 1400 हिंदू कुटुंबांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचे धनादेशही वाटले. दरम्यान, कुणी अल्पसंख्याकांवर अत्याचार करत असेल तर मी पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन, असेही त्या म्हणाल्या.