हिंदुस्थानी संघाची काळजी घेऊ, पाकिस्तानात या

पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघाने पाकिस्तानात यावे, अशी विनंती पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने केली आहे. आम्ही संघाची पूर्ण काळजी घेऊ, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. सध्या ज्या बातम्या वाचायला मिळताहेत त्यानुसार बीसीसीआय आणि हिंदुस्थानी सरकार यांच्यात सकारात्मक चर्चा होतेय. मी असेही ऐकलेय की, हिंदुस्थानच्या सर्व लढती लाहोरला खेळवल्या जाणार आहेत. ते लाहोरला येतील आणि रात्रीच मायदेशी परततील. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की, आम्ही तुमची सर्वोत्तम काळजी घेऊ. हिंदुस्थानी संघातील विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंडय़ा आणि सूर्यकुमार यादवचे पाकिस्तानातही खंदे समर्थक आहेत. जर हिंदुस्थानी संघ पाकिस्तानात खेळायला आला तर हे क्रिकेटसाठी चांगलेच असेल आणि हे तितकेच पाकिस्तानी क्रिकेटच्याही भल्याचे असेल, असेही अक्रम म्हणाला.