मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड यांना गावकऱ्यांनी वेशीवरच रोखले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सभागृहात एक शब्दही बोलला नाहीत व आमदार म्हणून तुम्ही मराठा समाजासाठी काय केले? असा प्रश्नांचा भडिमार गावकऱ्यांनी केला. गावकऱ्यांचा रुद्रावतार पाहून डॉ. तुषार राठोड यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. चार दिवसांपूर्वी मांजरी गावात तुषार राठोड गेले होते. त्या वेळी तेथेही गावकऱ्यांनी गावचा विकास व गावचे प्रश्न मार्गी का लावले नाहीत व पाच वर्षांत आमदार म्हणून कोणते काम केले? असे प्रश्न विचारले.
पाच वर्षांत काय काम केले सांगा…
पाच वर्ष आमदार म्हणून तुम्ही कोणते विकासाचे काम केले ते सांगा, असा सवाल मराठा समाजातील तरुणांनी डॉ. राठोड यांना विचारला. मागील निवडणुकीत मराठा समाजाने तुम्हाला मतदान केले. परंतु, तुम्ही मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर सभागृहात एक चकार शब्दही उच्चारला नाही. आमदार म्हणून तुम्ही समाजासाठी काय केले, अशा प्रश्नांच्या फैरी तरुणांनी भाजपा उमेदवारावर झाडल्या.