केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांदा महाग, सुप्रिया सुळे यांचा घणाघात

केंद्र सरकारमुळे कांदा महाग झाला आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. केंद्र सरकारने कांद्याबाबत उशीर केला, हा उशीर अक्षम्य आहे असेही सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी एक्सवर ट्वीट करून म्हटले आहे की, अन्नधान्याची महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या महागाईवर अंकुश ठेवण्यात भाजपाप्रणीत एनडीए सरकारला सपशेल अपयश आले आहे. सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर 9.42 टक्क्यांवर गेला आहे. कांदा 70 रुपये किलो झाला तरीही मोठ्या प्रमाणात कांदा पुरविण्यासाठी रेल्वे रॅक देण्यास केंद्र सरकारने उशीर केला. यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. केंद्र सरकारने केलेला उशीर अक्षम्य आहे असेही सुळे म्हणाल्या.