अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्रात धडधडीत खोटी माहिती, निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह तक्रार

मिंधे टोळीचे सिल्लोड येथील उमेदवार अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात तब्बल १६ गंभीर प्रकारच्या चुका असल्याची तक्रार पुराव्यानिशी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. सत्तार यांनी शपथपत्रात मालमत्ता, चारचाकी वाहन, हिर्‍यांच्या दागिन्यांबद्दल धडधडीत खोटी माहिती दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.

अब्दुल सत्तार यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात धादांत खोटी माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी मालमत्तेचा तपशीलही लपवला आहे.

सत्तार यांनी शपथपत्रात दाखवलेल्या मालमत्तांचा तपशील आणि प्रत्यक्षातील मालमत्ता यात प्रचंड तफावत आहे. अनेक मालमत्तांचे क्षेत्रफळ चुकीचे दाखवण्यात आले आहे. मालमत्तेवर करण्यात आलेल्या बांधकामाच्या गुंतवणुकीची माहिती लपवण्यात आली आहे.

चारचाकी वाहनाची माहिती दिली असली तरी त्यात खरेदीचे वर्षच सांगण्यात आलेले नाही. जालना येथील मालमत्ताच या शपथपत्रातून गायब करण्यात आली आहे.

विविध सहकारी संस्थांमध्ये सत्तार यांचे शेअर्स आहेत. मात्र, या शेअर्सची धडधडीत खोटी माहिती देण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे पुराव्यानिशी सत्तारयांच्या शपथपत्राविरोधात तक्रार केली आहे.

उमेदवारी रद्द करण्याची मागणी

2019 च्या विधानसभा निवडणुकीतही सत्तार यांनी शपथपत्रात अनेक गोष्टी लपवून निवडणूक आयोगाची फसवणूक केली होती. या प्रकरणी डॉ. अभिषेक हरिदास यांनी सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली होती. या प्रकरणात न्यायालयाने सत्तार यांना समन्स बजावले होते. हे प्रकरण लवकरच सुनावणीसाठी येणार आहे.

पहिले शपथपत्र सदोष असताना दुसर्‍या निवडणुकीतही सत्तार यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक गोष्टी दडवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सत्तार यांची उमेदवारीच रद्द करण्यात यावी, अशी मागणी महेश शंकरपेल्ली यांनी केली आहे.