ससूनमध्ये रुग्णांची हेळसांड सुरुच

सर्वसामान्यरुग्णांचा आधार असलेल्या ससून रुग्णालयात रुग्णांचे होणारे हाल काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना मंगळवारी रात्री घडली असून, कॅन्सरग्रस्त असलेल्या महिलेला योग्य उपचार दिले जात नव्हते. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तिची हेळसांड केली जात असल्याचा प्रकार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेने उघडकीस आणला.

रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कॅन्सरग्रस्त महिलेवर योग्य उपचार केले जात नाहीत, तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तिची हेळसांड केली जात असल्याची माहिती युवती सेनेच्या शहरअधिकारी देविका घोसरे यांना मिळाली. त्यानंतर घोसरे यांनी युवासेनेचे शहरअधिकारी सनी गवते यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर गवते यांनी रुग्णालयात धाव घेत या प्रकाराबाबत पोलिसांमध्ये तक्रार करून महिलेवर योग्य उपचार करण्याची मागणी केली. तसेच रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे याठिकाणी गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या अधिष्ठातांसह येथील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही युवासेनेतर्फे करण्यात आली. अनिल परदेशी, वैशाली गुजर, अक्षता भिमाले, रवींद्र रेमजी, अल्फेज शेख, सोनू पुटगे यावेळी उपस्थित होते.

गेल्या वर्षभरापासून ससून रुग्णालयातील गैरप्रकार सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत. तर दुसरीकडे रुग्णांना वेळेवर उपचारसेवा मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ससून हे राज्यातील शासकीय रुग्णालयांपैकी प्रमुख रुग्णालय आहे. याठिकाणी पुण्यासह राज्याच्या कानाकोफ्यातून गरजू रुग्ण उपचारासाठी ससूनमध्ये दाखल होतात. रुग्णालयातील बेडच्या क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्याही हजारोंच्या घरात आहे. मात्र, दाखल होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. मागील काही दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या बेवारस रुग्णाला रुग्णालयातील डॉक्टरनेच निर्जनस्थळी सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.