वाराणसीत एकही उद्योग आणला नाही, गुजरातला सर्व पळवले; उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांचा हल्ला

महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला पळवले गेले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणसी मतदारसंघातही एकही उद्योग आणला नाही, असा जोरदार हल्ला उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी आज चढवला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेसुद्धा मोदींसारखे खोटारडे आहेत. त्यांनी आतापर्यंत लोकांना इव्हेंट आणि लेझर शो दाखवून गंडवले, असाही आरोप राय यांनी केला.

अजय राय यांनी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत बोलताना मोदी आणि योगी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, एअर बस असो वा सेमीपंडक्टर चिपचा उद्योग असो, मोदी सरकारने सर्व उद्योग महाराष्ट्रमार्गे गुजरातला नेले. ते उद्योग वाराणसीत येऊ शकत नव्हते का? वाराणसीच्या लोकांबद्दल मोदींना प्रेम नाही का? त्यांच्याबद्दल आपुलकी नाही का? असा सवाल राय यांनी उपस्थित केला. वाराणसीबद्दल मोदींना आपुलकी असती तर गुजरातमध्ये पळवलेले उद्योग वाराणसीत आले असते. पण वाराणसीकरांना इव्हेंट आणि लेझर शो दाखवून गंडवायचे आणि सर्व कामे गुजराथी उद्योगपतींना द्यायची असे मोदी सरकारचे चाललेय, असे अजय राय म्हणाले.