हिंदुस्थान आणि चीनने वादग्रस्त भागातून सैन्य माघारी घेण्याचे आणि या भागातील अस्थायी चौक्या हटवण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार आज सीमेवरील सैन्य मागे घेण्याची तसेच चौक्या हटवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे दोन्ही देशांत 2020 पासून सुरू असलेला सीमावाद आता संपुष्टात येणार असून देप्सांग पठार आणि देम्चोक या दोन ठिकाणी हिंदुस्थानी सैन्याला मे 2020 पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार आहे. दरम्यान, उद्या दोन्ही देशांतील सैन्य अधिकारी एकमेकांना मिठाई भरवून दिवाळीच्या शुभेच्छा देणार आहेत, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी आज दिली.
दोन्ही देशांनी सैन्य मागे बोलावले असून अस्थायी चौक्याही हटवल्या आहेत. आता दोन्ही देशांचे अधिकारी या भागांची पाहणी करत असून पाहणीदरम्यान ड्रोन्सची मदतही घेतली जात आहे. पाहणीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हिंदुस्थानच्या सैनिकांना गस्त घालता येईल; परंतु याबाबतची पूर्वकल्पना चीनच्या सैनिकांना देणे बंधनकारक असणार आहे. गस्त घालताना दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये कोणताही तणाव निर्माण होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे.
गलवान व्हॅली आणि गोगरा हॉट स्प्रिंग्सबद्दल निर्णय नाही
हिंदुस्थान आणि चीनमध्ये लडाखमधील डेपसांग अंतर्गत 4 मुद्दय़ांवर करार झाला; परंतु गलवान व्हॅली आणि डेमचोकमधील गोगरा हॉट स्प्रिंग्समध्ये गस्त घालण्याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. हिंदुस्थानी लष्कराच्या म्हणण्यानुसार सैनिक आता गस्त घालण्यासाठी डेपसांगमधील गस्त बिंदू 10,11,11-ए, 12 आणि 13 वर जाऊ शकतील. पेट्रोलिंग पॉइंट-14 म्हणजेच गलवान व्हॅली, गोगरा हॉट स्प्रिंग्स म्हणजे पीपी-15 आणि पीपी-17 हे बफर झोन आहेत. येथे गस्त घालण्याबाबत नंतर विचार केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.