हिंदुस्थान आणि कॅनडाचे संबंध दिवसेंदिवस खराब होत चालले असून कॅनडातील काही हिंसक घटनांप्रकरणी जस्टीन टडो सरकारने हिंदुस्थानवर गंभीर आरोप केले आहेत. कॅनडातील हिंसक घटनांमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, हे सर्व आरोप हिंदुस्थान सरकारने फेटाळले आहेत. खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत हिंदुस्थानच्या कथित सहभागाबाबतच्या आरोपानंतर हिंदुस्थान आणि कॅनडाचे संबंध बिघडले आहेत. दरम्यान, टडो सरकारने आरोपांबाबत कुठलाही पुरावा मात्र दिलेला नाही.
यापूर्वी कॅनडाने हिंदुस्थानचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांच्यावरही अशाच प्रकारचे आरोप केले होते. तेव्हाही हिंदुस्थान सरकारने कॅनडाच्या आरोपांचे खंडन केले होते. कॅनडाचे उपपरराष्ट्रमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी संसदीय समितीला सांगितले की शीख फुटीरतावाद्यांविरोधातील हिंसेमागे अमित शहा आहेत. एका पत्रकाराने विचारले की, त्या हिंसाचारामागे असणारी व्यक्ती म्हणजे अमित शहा आहेत का? त्यावर मी पुष्टी केली की हो तीच व्यक्ती त्या सर्व घटनांमागे आहे, असे मॉरिसन यांनी संसदीय समितीसमोर सांगितले आहे. अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वर्तमानपत्राला मॉरिसन यांनी अमित शहा यांच्याबद्दल सांगितले होते.
‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या अहवालात काय?
कॅनडातील हिंसक घटनांमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असल्याप्रकरणी कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणांनी पुरावे गोळा केल्याचा दावा ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या अहवालात करण्यात आला होता. हिंदुस्थानातील एका मोठय़ा पदावरील व्यक्तीने कॅनडात संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठीचे मिशन आणि शीख फुटीरतावाद्यांवर हल्ला करण्यासाठी मंजुरी दिली होती, असेही अहवालात सांगण्यात आले आहे. ती व्यक्ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असल्याचा दावा कॅनडातील सुरक्षा यंत्रणांनी केल्याचेही अहवालात म्हटले आहे.