सध्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा दम निवडणूक आयोगाने याआधीच कर्मचाऱयांना भरला आहे. असे असताना वाशीम जिह्यातील कारंजा येथे ईव्हीएमची सुरक्षा वाऱ्यावर सोडून सुरक्षा कर्मचारी गाढ झोपलेले आढळून आले.
विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी कारंजा येथील शेतकरी निवास येथे ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी अचानक रात्री भेट देऊन ईव्हीएमच्या सुरक्षेचा आढावा घेतला. मात्र, पोलीस कर्मचारी झोपलेले आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
चारजण निलंबित
जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांनी डय़ुटीवर झोपणाऱ्या पोलिसांना दणका दिला आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाईचे पाऊल उचलत दोन फौजदारांसह चारजणांना निलंबित करण्यात आले आहे.