विधानसभा निवडणुकीत अर्ज भरण्याच्या अखरेच्या दिवशी म्हणजे मंगळवारी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर झाले. सोलापूर जिल्हय़ातील करमाळा आणि माढा मतदारसंघामध्ये नावात साधर्म्य असणाऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरले. करमाळ्यात संजय शिंदे नावाचे तीन उमेदवार, माढय़ात चार अभिजीत पाटील तर दोन रणजितसिंह शिंदे रिंगणात आहेत. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असून प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
करमाळा मतदारसंघातून आमदार संजयमामा शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी संजय लिंबराज शिंदे (खांबेगाव, करमाळा) आणि संजय वामन शिंदे (दहिगाव, करमाळा) या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अभिजीत पाटील यांनी अधिकृत एबी फॉर्म भरला. अभिजीत धनवंत पाटील यांनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.
अभिजीत नावाचे चारजण
संजय या नावाप्रमाणेच अभिजीत या नावाच्या चारजणांनी अर्ज भरला. अभिजीत अण्णासाहेब पाटील, अभिजीत तुळशीराम पाटील असे चारजण एकाच नावाचे उमेदवार रिंगणात आहेत. आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे व अपक्ष रणजीत मारुती शिंदे यांनीही अर्ज भरले.