Maharashtra Assembly Election 2024 – अबब! आचारसंहितेत अवघ्या 15 दिवसात 187 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यात 15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे ठिकठिकाणी आचरसंहिंतेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत फक्त 15 दिवसांमध्ये 187 कोटी 88 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यलयाने या संदर्भात माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑक्टोबरपासून राज्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली. 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एकूण 187 कोटी 88 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने 11 कोटी रुपये, राज्य पोलीस विभागाने 75 कोटी रुपये आणि आयकर विभागाने 60 कोटी रुपये जप्त केले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यलायने दिली आहे. तसेच आचारसंहितेचा भंग करण्याचा प्रकार आढळून आल्यास आयोगाच्या ‘cVIGIL APP’ वर तक्रार करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले आहे. त्यानुसार तक्रारी येत आहेत व संबंधित ठिकणी यंत्रणांच्या माध्यमातून जप्तीची कारवाई केली जात आहे.