प्रसूती वेदना होऊनही सुट्टी न दिल्याने सात महिन्याचे बाळ गर्भातच दगावले, CDPOला पदावरुन हटविले

ओडीशाच्या डेरिबिस ब्लॉकमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे महिला आणि बाल विकास विभागामध्ये काम करणाऱ्या एका महिला लिपीकाचे सात महिन्याचे बाळ गर्भातच दगावल्याची घटना घडली आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) स्नेहलता साहू यांनी तिला त्रास दिला आणि प्रसूती वेदना होऊनही त्यांनी ना रजा दिली, ना वैद्यकीय मदत दिली, असा आरोप आहे. या घटनेनंतर एकच आक्रोश पसरला असून या प्रकरणी तत्काळ कारवाई करत प्रकल्प अधिकारी साहू यांना पदावरुन हटविण्यात आले आहे.

वर्षा प्रियदर्शीनी असे पीडित महिलेचे नाव आहे. तिने सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून ती हा त्रास सहन करत होती. त्यामुळे माझ्या बाळाचा मृत्यू झाला असा आरोप महिलेने केला आहे. या छळाचा थेट परिणाम बाळावर झाला आहे. सीडीपीओ स्नेहलता साहू यांनी मला प्रचंड त्रास दिला आहे आणि गर्भवती झाल्यानंतर जास्त त्रास द्यायला सुरुवात केली. मला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागले, मात्र तरीही मी काम करत होते. कहर म्हणजे प्रसूती वेदना सुरु झाल्यानंतरही स्नेहलता साहू यांनी ऑफिसातून जाण्याची परवानगी दिली नाही आणि ना कोणत्या प्रकारे वैद्यकीय व्यवस्था केली. माझ्या वेदनांकडे दुर्लक्ष केले. ज्यावेळी याबाबत त्यांच्याशी बोलले त्या उद्धटपणे बोलल्या. त्यानंतर कुटुंबातील लोकांना याची माहिती दिली. ते तत्काळ येऊन त्यांनी खासगी रुग्णालयात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.

या घटनेनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरस झाला. ज्यामध्ये वर्षा आपल्या सहकाऱ्यांसोबत कार्यालयात बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यासोबत वाद घालताना दिसली. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर घटना चर्चेत आली. या प्रकरणावरुन आता ओडीशाच्या उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई करत स्नेहलता साहू यांना पदावरुन हटविण्यात आले आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तर जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेच्या तपासानंतर कडक कारवाई केली जाईल.