टीम इंडियाने न्यूझीलंडविरूद्ध तिसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवत वन डे मालिका 2-1 ने जिंकली. या सामन्यात टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधनाने खणखणती शतक ठोकले आणि विक्रमाला गवसणी घातली. स्मृती आता टीम इंडियाकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारी महिला खेळाडू ठरली आहे.
स्मृती मानधनाने या सामन्यात जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत वन डे क्रिकेटमधील आठवे शतक झळकावले. तिने 122 चेंडूंमध्ये 100 धावा करून संघाच्या विजयात महत्त्वाची भुमिका पार पाडली. न्यूझीलंडने टीम इंडियाला 233 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने 4 विकेट गमावत लक्षाचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकला. स्मृतीने ठोकलेले शतक तिच्या वनडे कारकिर्दीतले आठवे शतक ठरले आहे. या बाबतीत तिने टीम इंडियाची माजी कर्णधार मिताली राजला मागे टाकले आहे. मिताली राजने 232 सामन्यांमध्ये 7 शतके ठोकली आहेत. मात्र आता मिताली राजचा रेकॉर्ड स्मृतीने मोडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मृतीचे हे 10 वे शतक ठरले. तिने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमधील 7 सामन्यांमध्ये दोन शतक झळकावली आहेत. महिलांच्या वन डे क्रिकेटचा विचार केला तर वन डे मध्ये सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाची माजी खेळाडू मेग लॅनिंगच्या नावार असून तिने आपल्या कारकिर्दीमध्ये एकून 15 शतके ठोकली आहेत.