Dhanteras Gold Buying – धनत्रयोदशीच्या मुहूर्ताला मोठी उलाढाल! देशात 20 हजार कोटींचं सोनं आणि 2500 कोटींची चांदीची विक्री

दिवाळीची सुरुवात म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस. दिवाळी म्हटल की सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करणारा सण. त्यामुळे दिवाळीत धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याला मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र यंदाच्या वर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या खरेदीत घट झाली आहे. धनत्रयोदशीला सोन्याचे भाव कमी होतील अशी अपेक्षा होती. मात्र सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. मात्र यंदा चांदीच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली. याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी वाहने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, भांडी, कपडे यासह अन्य उत्पादनांची चांगली खरेदी-विक्री झाली. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) च्या अहवालानुसार, यावर्षी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर 60 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे.

ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी धनत्रयोदशीला खरेदी होणाऱ्या सोने चांदीच्या विक्रीची माहिती दिली. सोने-चांदीच्या किमती वाढल्या असल्या तरी या धनत्रयोदशीला सोने-चांदीची चांगली विक्री झाली आहे. देशभरातून 20 हजार कोटी रुपयांचे सोने आणि 2500 कोटी रुपयांची चांदी खरेदी करण्यात आली. अंदाजे 30 टन सोने म्हणजेच 20 हजार कोटींहून अधिक सोने यंदा विकले गेले आहे. त्याच वेळी, 250 टन चांदीची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी सोने-चांदीचा मिळून सुमारे 25 हजार कोटींचा व्यवसाय होता, असे ते म्हणाले.

इंडियन बुलियन एंड ज्वैलर्स एसोसिएशनचे (IBJA) राष्ट्रीय सचिव सुरेंद्र यांनी देखील धनत्रयोदशीच्या खरेदीवर टीप्पणी केली. आज चांदीची विक्री 33 टक्क्यांनी वाढली आहे तर, सोन्याचे प्रमाण 15 टक्क्यांनी घसरले आहे. यावर्षीच्या धनत्रयोदशीला सोन्याची विक्री 35 टनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी सोन्याची विक्री 42 टनांपेक्षा कमी आहे. गेल्या दिवाळीपासून सोन्याच्या दरात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर कार आणि दुचाकीच्या विक्रीत 20 ते 25 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स एसोसिएशनतर्फे देण्यात आली आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ही वाढ 5 ते 12 टक्के एवढी होती. दिवाळीत वाहनांच्या विक्रीचा हा आकडा दुप्पट होऊ शकतो. धनत्रयोदशीच्या दिवशी कारच्या विक्रीत 10 टक्के आणि दुचाकींच्या विक्रीत 15 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.