विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूककाळात परवानाधारक पिस्तूल जवळ बाळगून फिरण्यास, सार्वजनिक ठिकाणी नेण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पिस्तूल जमा करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आतापर्यंत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 1122 परवानाधारकांनी आपल्याकडील पिस्तुले पोलिसांकडे जमा केली आहेत. ही पिस्तुले निवडणूक निकाल लागल्यानंतर म्हणजेच 23 नोव्हेंबरनंतर सात दिवसांनी परत केली जाणार आहेत.
राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आहे. ही निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी निवडणूक विभागाबरोबरच जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानेही कंबर कसली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत भोसरी, पिंपरी, चिंचवड, खेड, मावळ, भोर-वेल्हा-मुळशी, वडगाव शेरी, खडकवासला या विधानसभा मतदारसंघांचा भाग समाविष्ट होतो. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आवश्यक असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम प्राप्त अधिकारान्वये निवडणूक कालावधीत परवानाधारक पिस्तूल जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूककाळात शस्त्र बाळगणे, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.
आर्थिक व वैयक्तिक सुरक्षेच्या कारणास्तव, ग्रामीण भागात शेतातील पिकांचे संरक्षण, रानटी जनावरांपासून संरक्षण मिळविण्यासाठी पिस्तूल, रिव्हॉल्वर आणि दुबार बंदुकीचे परवानाने जिल्हाधिकाऱ्यांकडून दिले जातात. गृह विभागाने लागू केलेल्या सर्व अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शस्त्रपरवाना दिला जातो. पिंपरी आयुक्तालय हद्दीत एकूण एक हजार 800 पिस्तुले परवानाधारक आहेत. त्यांपैकी 1122 जणांनी आपली पिस्तुले पोलिसांकडे जमा केली आहेत. संबंधित पोलीस ठाण्याने परवानाधारकाला पिस्तूल जमा करण्याबाबत नोटीस बजावल्यास सात दिवसांच्या आत पिस्तूल जमा करणे बंधनकारक असते. शहरासह ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण मोठे आहे. आतापर्यंत अनेक गुन्ह्यांत गावठी कट्टे,पिस्तुले अशा शस्त्रांचा वापर झाला असून, निवडणूककाळात तर या गुन्ह्यांचे प्रमाण आणखी वाढते. याच पार्श्वभूमीवर ही शस्त्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या परवानाधारकावर गंभीर गुन्हा दाखल आहे किंवा गंभीर गुन्ह्यातून ज्यांची नुकतीच जामिनावर सुटका झालेली आहे किंवा अशी राजकीय व्यक्ती ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा व्यक्तींना संबंधित पोलीस ठाण्यात शस्त्रे जमा करावी लागणार आहेत. उर्वरित शस्त्रधारकांना निवडणुकीच्या काळात शस्त्रे जवळ बाळगण्यास, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे नेण्यास प्रशासनाने मनाई केलेली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर सात दिवसांनंतर ही शस्त्रे परत केली जाणार आहेत.
…तरच शस्त्र बाळगता येणार !
निवडणूककाळात सरसकट सर्वांचीच शस्त्रे जमा करून घेता येणार नाहीत, असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनालाही या आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. एखाद्या राजकीय व्यक्तीला खरोखरच शस्त्र जवळ बाळगणे आवश्यक असेल, तर तसा अर्ज त्याने देणे आवश्यक असते. त्यानंतर संबंधित समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित राजकीय व्यक्तीला शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यायची किंवा नाही, याबाबत निर्णय घेतला जातो.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एक हजार 800 परवानाधारक पिस्तुले आहेत. यांपैकी 366 जणांना सूट देण्यात आली असून, इतरांना पिस्तूल जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आतापर्यंत 1122 जणांनी पिस्तुले जमा केली आहेत. तसेच इतरांकडूनही पिस्तुले जमा करून घेतली जात आहेत.