चिंचवडमध्ये 32, पिंपरीत 39, तर भोसरीत 24 अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत चिंचवड मतदारसंघात एकूण 32 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पिंपरी मतदारसंघात 39 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर, भोसरी मतदारसंघात 24 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मंगळवारी (29 रोजी) अखेरच्या दिवशी 19 उमेदवारांनी 26 उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण 32 उमेदवारांनी 44 उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील माजी नगरसेवक नाना काटे आणि भाऊसाहेब भोईर यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. माजी नगरसेवक मारुती भापकर (महाराष्ट्र स्वराज पक्ष), अरुण पवार (संभाजी ब्रिगेड), जितेंद्र वाडघरे (वंचित बहुजन आघाडी), राजेंद्र गायकवाड (बसपा) यांच्यासह एकूण 32 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीत बंडखोरी झाल्यामुळे भाजपचे शंकर जगताप यांच्यासमोरील अडचणींत वाढ झाली आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मंगळवारी (29 रोजी) अखेरच्या दिवशी तब्बल 30 उमेदवारांनी 33 उमेदवारी अर्ज दाखल केले. तर, आतापर्यंत एकूण 39 उमेदवारांनी 45 उमेदवारी अर्ज दाखल केले. पिंपरी मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांनी, तर अजित पवार गटातर्फे आमदार अण्णा बनसोडे यांनी अर्ज दाखल केला आहे. हा मतदारसंघ आरपीआयला मिळावा, अशी मागणी माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी केली होती. मात्र, बनसोडे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज झालेल्या सोनकांबळे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय या मतदारसंघातून भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी बंडखोरी करीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे अर्ज भरला आहे. मिंधे गटाचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक काळूराम पवार, तसेच मनोज गरबडे (वंचित बहुजन आघाडी) यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघातून 23 उमेदवारांनी 18 अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण 24 उमेदवारांनी 33 उमेदवारी अर्ज दाखल केले. भोसरी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात महायुतीतून भाजपचे उमेदवार महेश लांडगे आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी रॅली काढत निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे अर्ज सादर केला. खासदार डॉ. अमोल कोल्हे, काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, सुनिल गव्हाणे, इम्रान शेख, नवनाथ जगताप, मच्छिंद्र तापकीर, संपत पवार उपस्थित होते.

सुलक्षणा शिलवंत-धर यांनी मंगळवारी आकुर्डीतील खंडोबा मंदीर येथून पदयात्रा काढली. हेडगेवार भवन येथे उमेदवारी अर्ज सादर केला. खासदार डॉ. अमोल कोल्हे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शंकर पांढरकर, आपच्या शहराध्यक्ष मीना जावळे आदी उपस्थित होते