भरधाव वेगातील वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वांद्रे येथे घडली. तरबेज कुरेशी असे मृताचे नाव आहे. त्याचा मित्र नौशाद हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
नौशाद हा वांद्रे बेहरामनगर येथे राहतो. तो डिलिव्हरी बॉयचे काम करतो. तरबेज हा नौशादचा मित्र आहे. शनिवारी रात्री ते दोघे त्याच्या मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात होते. नौशाद हा मोटारसायकल चालवत होता, तर तरबेज हा मागे बसला होता. ते पश्चिम द्रुतगती महामार्ग येथून माहीमच्या दिशेने जात होते. तेव्हा भरधाव वेगातील वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. त्या धडकेने त्यांची मोटारसायकल स्लिप झाली. त्यामुळे ते दोघे खाली पडले. तरबेजच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती समजताच वांद्रे पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी त्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तरबेजला तपासून मृत घोषित केले, तर नौशादवर उपचार सुरू आहेत. नौशादने दिलेल्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद केला. अपघातानंतर पळून गेलेल्या वाहनचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.