मुंबईत महिनाभर पॅराग्लायडर्स, ड्रोन, हॉट एअर बलूनवर बंदी

सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. शिवाय दीपावलीचा सणदेखील उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मुंबई पोलिसांनी शहरात महिनाभर ड्रोन, पॅराग्लायडर्स, हॉट एअर बलून यांच्या वापरावर प्रतिबंध घातला आहे.

समाजकंटकांकडून ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्सचा वापर करून त्याद्वारे कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. शिवाय निवडणुकीची धामधूम व दीपावली सणाच्या आनंदात विघ्न आणण्याचे कटकारस्थान याद्वारे आखले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांकडून 31 ऑक्टोबरपासून 29 नोव्हेंबर या एक महिन्याच्या कालावधीत शहरात ड्रोन, पॅराग्लायडर्स, हॉट बलून, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, कंट्रोल्ड मायक्रो-लाईट एअरक्राफ्ट यांच्या उdड्डाणावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. दरम्यान, असे असतानाही कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.