जम्मू-कश्मीरच्या अखनूरमध्ये सोमवारी सुरू झालेली चकमक तब्बल 27 तासानंतर म्हणजेच मंगळवारी रात्री 10 वाजता संपली. सुरक्षा दलांनी नियंत्रण रेषेजवळील भट्टल येथील जंगलात एकूण तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सोमवारी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले होते. आज आणखी दोन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले. दरम्यान, लष्कराच्या मदतीसाठी तैनात असलेला चार वर्षांचा ‘फँटम’ हा बेल्जियन शेफर्ड जातीचा श्वान चकमकीत शहीद झाला. दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
जम्मू-कश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळील खूर येथे दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक उडाली. त्यात ‘फँटम’ला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्स या अधिकृत एक्स हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली. आज लष्कराच्या तुकडीने दहशतवाद्यांना घेरले असताना त्यांच्याकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. यात एक गोळी ‘फँटम’ला लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.