इस्रायलने पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी यूएनआरडब्ल्यूए अर्थात युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सीला इस्रायली सीमेमध्ये प्रवेश करण्यास मनाई करणारे दोन कायदे पारित केले आहेत. त्यामुळे निर्वासित पॅलेस्टिनी नागरिक पुन्हा संकटात सापडले आहेत.
पहिल्या इस्रायली कायद्याच्या समर्थनार्थ 92 जणांनी मतदान केले, तर विरोधात 10 जणांनी मतदान केले. या कायद्यांतर्गत यूएनआरडब्ल्यूएला इस्रायलमधील सर्व क्रियाकलाप, परस्परसंवाद किंवा सेवांपासून प्रतिबंधित करण्यात आले. दुसऱया कायद्याच्या समर्थनार्थ 87 जणांनी मतदान केले, तर नऊ जणांनी विरोधात मतदान केले. या कायद्यांतर्गत औपचारिकपणे इस्रायलचे यूएनआरडब्ल्यूए संस्थेबरोबरचे राजनैतिक संबंध तुटले आहेत. यूएनआरडब्ल्यूएचे अनेक कर्मचारी पॅलेस्टिनी गट हमासशी जोडले गेले गेल्याचे कारण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन करताना दिले.
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझातील 60 जणांचा मृत्यू
इस्रायलने पुन्हा गाझा पट्टीत हल्ले सुरू केले असून आज सकाळी केलेल्या हल्ल्यात जवळपास 60 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला. यात अर्ध्याहून अधिक महिला आणि मुलांचा समावेश असल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. इस्रायलने लेबनॉनवरही हल्ले सुरूच ठेवले आहेत.
हिजबुल्लाहने केली नव्या नेत्याची निवड
दुसरीकडे लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने हसन नसरुल्लाहच्या खात्म्यानंतर त्याच्या जागी शेख नईम कासीम या नव्या नेत्याची निवड केली आहे. इस्रायलशी लढा शेवटपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णयही घेतल्याचेही हिजबुल्लाने स्पष्ट केले आहे.