>> शहाजी शिंदे
वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढविण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या पाच परमरुद्र सुपर कॉम्प्युटरचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. आराखड्यापासून निर्मितीपर्यंत पूर्ण स्वदेशी आणि उच्च क्षमता असलेले हे पहिले सुपर कॉम्प्युटर आहेत. या सुपर कॉम्प्युटरचा वापर जलद रेडिओ स्फोटांच्या नोंदी आणि पल्सारच्या अभ्यासासाठी केला जाणार आहे. हा संगणक प्रतिसेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो.
‘विकसित भारता’चे स्वप्न साकारण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडून येणे गरजेचे आहे. या दृष्टीने भारतीय शास्त्रज्ञांनी अलीकडेच एक मोठी उपलब्धी मिळवली आहे. पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानाने साकारलेल्या परमरुद्रसह तीन महासंगणकांची निर्मिती ही गेम चेंजर ठरणारी आहे. या सुपर कॉम्प्युटरच्या माध्यमातून आकाशगंगेची उत्पत्ती, कृष्णविवर, खगोलशास्त्र आणि हवामान क्षेत्र यामधील अनेक महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत मिळणार आहे. भारतीय तंत्रज्ञानाच्या विकासात हा मैलाचा दगड ठरला आहे. या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानाचा विकासाचा मार्ग मोकळा होऊन देशातील नवसंशोधनाला बळ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच या महासंगणकाचे लोकार्पण केले. परमरुद्रशिवाय अन्य दोन सुपर कॉम्प्युटरचे नाव अरका आणि अरुणिका असे ठेवण्यात आले आहे. देशाला लाभलेले हे तीन महासंगणक पर्यावरण, हवामानबदल यासह अनेक क्षेत्रांत भारतासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
सद्यस्थितीत जागतिक पातळीवर चीनकडे सर्वाधिक सुपर संगणक आहेत. त्यानंतर अमेरिका, जपान, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, आयर्लंड आणि ब्रिटनचा नंबर लागतो. महासंगणकांच्या दुनियेत आघाडीच्या 500 संगणकांच्या यादीत पाकिस्तानचे नाव कोठेही नाही. त्यांच्याकडे कमी दर्जाचे महासंगणक आहेत. तुलनेने चीन, अमेरिका आणि जपान आघाडीवर आहेत. चीनकडे 219, अमेरिकेकडे 116, जपानकडे 35, जर्मनीकडे 25 आणि फ्रान्सकडे 18 महासंगणक आहेत. भारताकडे टॉप 500 च्या यादीत 11 पेक्षा अधिक महासंगणक आहेत. विशेष म्हणजे भारताचे महासंगणक हे गणना करण्यास खूपच आधुनिक आहेत. परम अनंत, परम शिवाय, परम शक्ती, परम ब्रह्म यांसारख्या महासंगणकांचा जगात अगोदरच बोलबाला झाला आहे. परमरुद्र हा याच क्रमातील आधुनिक श्रेणी मानली जाते.
सुपर कॉम्प्युटर तंत्रज्ञान ही जगातील अशी क्रांती आहे की, ती सर्वच देशांना हवीहवीशी वाटते. भारतानेही आता यात बाजी मारली आहे. स्वतःचा सुपर संगणक असणे ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे, परंतु सुरुवातीच्या काळात अडथळे होते. 1980 च्या दशकात अनेक गोष्टींसाठी आपण विकसित देशांवर अवलंबून होतो. त्यातही संगणकाचा समावेश होता. अमेरिकेने आपल्याला महासंगणक आयात करण्याची परवानगी नाकारली होती. 21 व्या शतकाच्या प्रारंभी अमेरिकेने दिलेला नकार हा विकासाची शिखरे गाठण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भारतीयांच्या मनाला लागला. तेव्हा ‘सीडॅक’ आणि त्याचे प्रमुख डॉ. विजय भटकर यांनी देशात महासंगणक तयार करण्याचे ठरविले आणि त्याचे नाव परम असे ठेवले. ‘परम’ या संस्कृत शब्दाचा अर्थ सर्वोत्तम. या प्रकल्पासाठी तत्कालीन सरकारने तीस दशलक्ष डॉलरची मदत केली. परंतु अन्य देशांत सुपर कॉम्प्युटर तयार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत ही खूपच कमी होती. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांपुढे कमी पैशांत संगणक साकारण्याचे आव्हान होते. 1991 मध्ये भारताला स्वदेशी तंत्रज्ञानाचा ‘परम 8000’ हा महासंगणक मिळाला. त्यानंतर ‘परम’मध्ये वेळोवेळी बदल झाले.
परमरुद्र सुपर कॉम्प्युटिंग सिस्टिमची प्रोसेसिंग स्पीड हा एक पेटाफ्लॉप प्रती सेकंद आहे. म्हणजे संगणकाच्या एक सेकंदात एक हजार खर्व फ्लोटिंग पॉइंट मोहीम महासंगणक पार पाडू शकतो. कोणत्याही एका मशीनसाठी हा संगणकीय वेग महाकाय म्हणावा लागेल. एचएसपी (हाय परफॉर्मेस कॉम्प्युटिंग) सुपर कॉम्प्युटिंग सिस्टिम ही उच्च प्रतीची संगणकीय प्रणाली आहे आणि त्याची निर्मिती किचकट, गुंतागुंतीचे व डेटा वहनकार्य हाताळण्यासाठी केली आहे. या प्रणालीचा वापर साधारणपणे हवामान बदल मॉडेलिंग, आण्विक जीव विज्ञान, जीनोमिस, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लार्ंनग, इंजिनीअरिंग आणि संरक्षण तसेच एरो स्पेसच्या क्षेत्रात करण्यात येतो. परमरुद्र ही एक उच्च कामगिरी करणारी संगणकीय प्रणाली असून त्यात किचकट स्वरूपाची गणना आणि सिमुलेशनला उल्लेखनीय गतीने सांभाळण्यासाठी तयार करण्यात आली आहे. महासंगणक हे भारताच्या राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशनचा भाग असून तो स्वदेशात उच्च प्रतीचे तंत्रज्ञानाचे तसेच सातत्याने विकसित होणाऱ्या क्षमतेचे प्रतीक आहे.
पुण्यात स्थापन केलेल्या महाकाय मीटर रेडिओ टेलिस्कोपद्वारे (जीएमआरटी) परमरुद्रचा वापर फास्ट रेडिओ बर्स्ट (एफआरबी) आणि अन्य खगोलीय घटनांचा अभ्यास करण्यासाठी केला जाणार आहे. साहजिकच यामुळे आकाशगंगेबाबत अद्ययावत माहिती मिळेल. नवी दिल्लीतील इंटर युनिव्हर्सिटीतील त्वरक केंद्र (आययूएसी) मधील महासंगणक हा पदार्थविज्ञान आणि आण्विक भौतिकमध्ये संशोधनाला चालना देईल. अरका आणि अरुणिका हे सूर्यावर आधारित आहेत. 850 कोटी रुपये खर्चातून तयार केलेल्या या सिस्टिमने मिळालेली प्रोसेसिंग क्षमता 21.3 पेटाफ्लॉप आहे. हे दोन्ही महासंगणक नोएडा येथील नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर पह्रकास्ट आणि पुण्यातील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ट्रॉपिकल मीटरोलॉजीतील प्रत्युष आणि मिहिर या सिस्टिमची जागा घेतील. भविष्यात अरका आणि अरुणिकाच्या मदतीने उच्च प्रतीचे मॉडेल तयार केले जाईल आणि ते चक्रीवादळ, मुसळधार पाऊस, वादळ, अतिवृष्टी, उष्णतेची लाट, दुष्काळ आणि अन्य हवामानासंबंधी उपयुक्त माहितीबाबत अचूक अंदाज व्यक्त करण्यात मोलाची कामगिरी बजावतील. या मदतीने भारत हवामानशास्त्र क्षेत्रात कळीची भूमिका बजावू शकतो.
या प्रणालीचा परिणाम शास्त्रीय संशोधनाव्यतिरिक्त अन्य अनेक क्षेत्रांवरही होईल. यात कृषी, आपत्ती व्यवस्थापन, अवकाश संशोधन यासह विविध क्षेत्रास लाभ मिळवून देण्याची यात अफाट क्षमता आहे. उदा. हवामानाचा अचूक अंदाज हा शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात मदत करेल. साहजिकच स्वदेशात विकसित होणारे महासंगणक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकणारे ठरणार आहे. हे पाऊल शास्त्रीय शोध आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचे जागतिक केंद्र करण्याच्या देशाच्या व्यापक ध्येयाला पूरक आहे.
(लेखक संगणक प्रणाली तज्ञ आहेत.)