नवाब मलिकांनी भाजपला फाट्यावर मारले, अजित पवार गटाकडून भरला उमेदवारी अर्ज

माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर असलेल्या आरोपांमुळे त्यांना महायुतीत सहभागी करून घेण्यास भाजपचा विरोध आहे. मात्र तरिही नवाब मलिक यांनी मंगळवारी अजित पवार गटातून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे एकंदरीत महायुतीत अजित पवार आणि नवाब मलिक यांनी भाजपला फाट्यावर मारल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

नवाब मलिक यांनी मंगळवारी मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. यात एक अर्ज हा अपक्ष म्हणून तर दुसरा अर्ज हा अजित पवार गटाकडून त्यांनी भरला आहे. स्वत: नबाव मलिक यांनी ही माहिती दिली आहे.

‘मी आज मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. मी अपक्ष म्हणून देखील एक अर्ज दाखल करून ठेवला आहे. मात्र पक्षाने मला एबी फ़ॉर्म पाठवल्यानंतर मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा मीच अधिकृत उमेदवारी आहे’, असे मलिक म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कथित आरोपांवरून नवाब मलिक यांना तुरुंगात जावे लागले होते, मात्र ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली असल्याने मलिक काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक सत्ताधारी बाजूला बसल्याने भाजपने बराच आकंडतांडव केला होता. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट पत्र धाडत मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला होता.