देशातील लोकांना जीवनावश्यक औषधे स्वस्त दरात मिळत राहावीत त्यासाठी औषधांच्या किमतींवर सरकारने नियंत्रण आणले आहे. दिवाळीआधीच सरकारने कर्करोगाच्या रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. याचपार्श्वभूमीवर कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या तीन प्रमुख औषधांचा एमआरपी कमी होणार आहे. त्यासाठी शासनाने आदेशही दिले आहेत.
देशातील अत्यावश्यक औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचे काम नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी तर्फे (NPPA) केले जाते. दरम्यान NPPA ने कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या तीन औषधांची MRP कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. यात ट्रैस्टुजुमाब, ओसिमर्टिनिब आणि डुर्वालुमाब या औषधांच्या नावांचा समावेश आहे.
सर्वसामान्यांना कमी किमतीत अत्यावश्यक औषधे मिळावीत यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे औषधांच्या किमती कमी करण्याच्या सूचना एनपीपीएने दिल्या आहेत. त्यामुळे कर्करोगाच्या औषधांवरील जीएसटी दर कमी करण्यात आला आहे. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2024-25 मध्ये या औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द करण्याची घोषणाही केली होती. त्यामुळे या जीएसटी दर कमी केल्याचा परिणाम औषधांच्या किमतीवरही दिसायला हवा, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे आता त्यांची एमआरपी कमी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
सरकारने या औषधांवरील जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 5 टक्के केला आहे. त्यामुळे कंपन्यांना 10 ऑक्टोबर 2024 पासूनच त्याची औषधांची MRP कमी केली आहे. तसेच उत्पादकांना एमआरपी कमी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.